5377 hectares of crops destroyed : आदिवासीबहुल संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यामध्ये दोन दिवस वादळी पावसाने पाच हजार हेक्टरवरील रब्बी पिके आडवी झाली.

बुलढाणा : संग्रामपूर तालुक्यातील २४ व जळगाव जामोद तालुक्यातील १२ गावांना २८ व २९ जानेवारी असे दोन दिवस अवकाळी वादळ आणि पावसाचा फटका बसला. जळगावमधील सुनगाव, सालवनसह चार ते पाच गावांमध्ये तुरळक गारपीट झाली. वादळी तडाख्याने सुमारे पाच हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांची हानी झाली.
संग्रामपूर तालुक्यात लाडणापूरसह चोवीस गावांत १५८६.७० हेक्टरवरील रब्बी मका, हरभरा, गहू तसेच संत्रा बागांची हानी झाली आहे. २ हजार २५२ शेतकऱ्यांचे यात नुकसान झाले. याबाबत कृषी विभागाने ३० जानेवारी रोजी प्रशासनाकडे अहवाल पाठविला आहे.
जळगाव जामोद तालुक्यामधील १२ गावांमध्ये ३७८१ हेक्टर क्षेत्रावरील गहू, हरभरा, मका व कांदा पिकाची हानी झाली. दोन्ही तालुक्यांमध्ये ५ हजार ३७७ हेक्टर रब्बी क्षेत्र बाधित झाले आहे.




