74 enterprising teachers honored : जिल्हा परिषद आणि ओपन लिंक्स फाउंडेशन (OLF) यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय गुणगौरव समारंभात ७४ उपक्रमशील व आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

विनोबा कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरावर गुणगौरव
खामगाव : जिल्हा परिषद आणि ओपन लिंक्स फाउंडेशन (OLF) यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय गुणगौरव समारंभात ७४ उपक्रमशील व आदर्श शिक्षकांचा उत्साहात सन्मान करण्यात आला.
शैक्षणिक गुणवत्तेत सातत्य राखत विविध उपक्रमांत सक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या शिक्षकांच्या कार्याची दखल या सोहळ्यात घेण्यात आली. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, प्रकल्प अधिकारी पी.एस. कोल्हे तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांची उपस्थिती होते. मुख्य कार्यकारी अधिकारी खरात यांनी गौरवप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करत जिल्हा परिषद शाळांमधील गुणवत्तेचा आलेख अधिक उंचावण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
यावेळी उपशिक्षणाधिकारी अकील शेख, अनिल देवकर, विस्तार अधिकारी जयमाला राठोड, अतुल देशपांडे, मोहन सुरडकर व शेख नजीर उपस्थित होते.
सप्टेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत ‘पोस्ट ऑफ द मंथ’ (POM) स्पर्धेत यश मिळवलेल्या शिक्षकांचा जिल्हास्तरावर सत्कार करण्यात आला. याशिवाय जीवन कौशल्य उपक्रमांतर्गत महावाचन, कथा वाचन, कविता वाचन, स्पोकन इंग्लिश, स्पेलिंग बी आणि मॉर्निंग असेंब्ली यांसारख्या उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांनाही विशेष गौरविण्यात आले.
दरम्यान, एनएमएमएस (NMMS) व शिष्यवृत्ती सराव परीक्षांमध्ये जिल्ह्याचा निकाल उंचावणाऱ्या शाळांचाही सन्मान करण्यात आला. एनएमएमएस परीक्षेत जिल्ह्यात अव्वल तीन क्रमांक पटकावणाऱ्या शाळा तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत पाचवी व आठवीच्या वर्गांत उत्कृष्ट निकाल देणाऱ्या प्रत्येकी तीन शाळांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या सोहळ्यात एकूण ७४ शिक्षक व ९ शाळांचा सन्मान करण्यात आला असून, ५ शाळांना लायब्ररी बॅगचे वितरणही करण्यात आले.
या सन्मान सोहळ्यातील प्रत्येक गौरव हा शिक्षकांच्या अथक परिश्रमांची, विद्यार्थ्यांप्रती असलेल्या प्रेमाची आणि शिक्षण क्षेत्रातील निष्ठेची जाणीव करून देणारा ठरला. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गौरवप्राप्त शिक्षकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत त्यांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी ठरावे, असे मत व्यक्त केले.


