Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Camp in Shegaon Taluka : शेगाव तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर.
महसूल प्रशासनाचा लोकाभिमुख उपक्रम
बुलढाणा : सामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या शासकीय कामांमधील अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागामार्फत “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा १” शेगाव तालुक्यात राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या नियोजनासाठी खामगाव उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच तहसील कार्यालय, शेगाव येथे विभाग प्रमुखांची बैठक पार पडली.
एकाच छताखाली मिळणार १५ विभागांच्या सेवा
५ मंडळांत शिबिर
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान व्हावे, या उद्देशाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हे अभियान राबवले जात आहे. शेगाव तालुक्यातील जवळा बु. मंडळ येथे ७ मार्च रोजी, १४ मार्चला जलंब मंडळ, १० एप्रिलला मनसगाव मंडळ, ८ मेला शेगाव (शहर) मंडळ तर १५ मे रोजी माटरगाव मंडळ येथे शिबिर होणार आहे. या विशेष शिबिरात महसूल विभागासह महिला व बालविकास, आरोग्य विभाग, सहकार विभाग, निवडणूक विभाग, नगर पालिका, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, दुय्यम निबंधक कार्यालय, वन विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत विभाग, पंचायत समिती, अन्न व नागरी पुरवठा, संजय गांधी योजना विभाग व मनरेगा आदी एकूण १५ विभाग सक्रिय सहभागी होणार आहेत.
शिबिरामध्ये जिवंत ७/१२ मोहिम अंतर्गत वारस नोंद, लक्ष्मी मुक्ती, अपाक नोंदी, एकत्र नोंदी आदी प्रकरणे निकाली काढून ७/१२ व ८ -अ वाटप, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे अर्ज स्वीकृती व मंजुरी, लोकसेवा हक्क कायद्यानुसार उत्पन्न, रहिवासी/अधिवास, जातीचे व नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्रे वितरण, मंडळ स्तरावर फेरफार अदालतीद्वारे प्रलंबित फेरफार मंजुरी, भूसंपादन व अकृषक परवानगी प्रकरणांची नोंद अद्ययावत करणे, शाळांमध्ये दाखला शिबिरे आयोजित करून विद्यार्थ्यांना दाखले वितरण, नविन अकृषक तरतुदी संदर्भात मार्गदर्शन, भोगवटादार वर्ग २ संदर्भातील अर्ज स्वीकृती व तपासणी, तुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहारांची गावनिहाय यादी तयार करणे, अतिक्रमित शेतरस्ते, शिवार रस्ते व पानंद रस्ते खुले करणे, ई-हक्क प्रणाली अंतर्गत अर्ज स्वीकृती, आरोग्य विषयक सेवा (आभा कार्ड), लाडकी बहिण योजना ई-केवायसी, ई-मोजणी, प्रॉपर्टी कार्ड, वारस नोंदी, नकाशे वाटप, अँग्रीस्टॉक (फार्मर आयडी), पीएम किसान अंतर्गत लँड सिडिंग, आधार सिडिंग, ई-केवायसी कामकाज होणार आहे.
या शिबिरामध्ये सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असून नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा व आपल्या तक्रारी थेट शिबिरात मांडून तत्काळ निवारण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे महसूल प्रशासन व नागरिक यांच्यातील दुवा अधिक बळकट होऊन शासकीय योजनांचा लाभ थेट पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल. सदर अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, महिला बचत गट, तरुण मंडळे, विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

