बुलढाणा : ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये पीकेटी७सीपी१ हा वाघ रुळला असून त्याच्या जोडीला वंश वाढविण्यासाठी मादी आणण्याचे प्रयत्न जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

बुलढाणा शहरापासून दहा किलोमीटर अंतरापासून ज्ञानगंगा अभयारण्याचे क्षेत्र पसरले आहे. पुढे खामगाव तालुक्यापर्यंत अभयारण्याचा विस्तार वाढलेला आहे. चारही बाजूने अभयारण्य २०५ चौरस किलोमीटर पसरलेले आहे. या अभयारण्यामध्ये पेंच प्रकल्पातून पीकेटी७सीपी१ हा पट्टेदार वाघ पंधरा दिवसांपूर्वी आणला होता. त्याचे पुनर्वसन यशस्वीरित्या झाले आहे. जंगलात पाऊल ठेवताच त्याने शिकारही केली. रोही, रानडुक्कर, सांबर, भेडकी, काळविट, मोर असे तृणभक्षी प्राणी मोठ्या प्रमाणात असल्याने तो सध्या या जंगलात रमला आहे.
यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातून टी-वन सी-वन हा वाघ स्वतःहून चालत आला होता. ज्ञानगंगा अभयारण्यात नऊ महिने त्याने आपले अस्तित्व दाखवून दिले होते. परंतु जोडीदार न मिळाल्याने तो मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अंबाबरवा अभयारण्याच्या दिशेने निघून गेला.
आता आणलेला वाघ अभयारण्य सोडून जाऊ नये, त्याचा परिवार वाढवा या दृष्टीने जिल्हा प्रशासनाच्या वतीने मादी आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. लवकरच वाघाला जोडीदार मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी व्यक्त केला.