ASHA workers starved in disaster workshop : येथील जिजाऊ सृष्टीवर आयोजित आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कार्यशाळेत आशा सेविकांना चक्क उपाशी ठेवण्यात आल्याचा प्रकार घडला. पंगतीत बसल्यानंतर जेवण न वाढल्याने उठावे लागल्याने आशांनी संताप व्यक्त केला.

पंगतीत बसवून जेवणच नाही वाढले : सिंदखेड राजा येथील कार्यशाळेतील प्रकार : आयोजकांविरुद्ध संताप
सिंदखेड राजा : येथील जिजाऊ सृष्टीवर आयोजित आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कार्यशाळेत आशा सेविकांना चक्क उपाशी ठेवण्यात आल्याचा प्रकार घडला. पंगतीत बसल्यानंतर जेवण न वाढल्याने उठावे लागल्याने आशांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, निवेदन देण्यासाठी तहसीलकडे जाताना उपाशी असलेल्या एका सेविकेचा भोवळ येऊन पडल्याने हात मोडला. जिजाऊनगरीत प्रशासनाकडून जिजाऊंच्या लेकींचा अवमान करण्यात आल्याचा आरोप तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला.
- (ही बातमी पण वाचा) https://mahadesha.com/bypolls-announced-for-vacant-sarpanch-and-member-posts-in-59-gram-panchayats-in-the-district/
आशा सेविका संघटनेच्या तालुकाध्यक्ष सुमित्रा महेंद्र लिहिणार यांच्यासह सेविकांनी दिलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार, १६ मार्च २०२६ रोजी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कार्यशाळेला आशा सेविकांनी प्रशिक्षणाला उपस्थित राहण्याबाबत पत्र देण्यात आले होते. चहा, नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था असल्याचे त्या पत्रात नमूद करण्यात आले होते. सकाळी दहा ते सायंकाळी ही प्रशिक्षणाची वेळ होती. दुपारी लंच ब्रेक म्हणून सुट्टी देण्यात आली. भुकेने व्याकुळ झालेल्या सर्व आशा यांच्यासह प्रशिक्षक जेवणासाठी बसले. प्रशिक्षकांना जेवण वाढण्यात आले. मात्र, आशा पंगतीत बसून जेवण येण्याची प्रतीक्षा करत असताना तासाभराचा कालावधी उलटूनही जेवण आले नाही. आयोजकांकडे सुमित्रा लिहीणार या आशांची प्रतिनिधी म्हणून विचारणा करण्यासाठी गेल्या असता शंभर लोकांच्या जेवणाचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले. आशांचे BCM अतिष जाधव यांना भ्रमणध्वनीवर संपर्क करून त्यांच्या कानावर ही बाब घालण्यात आली.
आरोग्य सेवक शरद वाघमारे, राजेंद्र शेळके, खरात, अतिष जाधव यांनी समजूत काढल्यानंतर सर्व आशा तहसील कार्यालयाकडे निवेदन देण्यासाठी निघाल्या.
- चक्कर आल्याने वर्दडीच्या सेविकेचा हात मोडला
- तहसील कडे जात असताना वर्दडी येथील आरती काकडे या उपाशी असल्याने चक्कर येऊन जमिनीवर कोसळल्या. त्यांच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झाले. त्यांना उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले. आयोजकांनी जेवण दिले असते तर ही वेळ आली नसती, असा आरोप लिहिणार यांनी केला.
१६७ सेविकांनी केला निषेध
पंगतीत बसल्यानंतरही जेवण न दिल्याने अपमानित झालेल्या प्रशिक्षणासाठी उपस्थित १६७ आशा सेविकांनी आयोजकांचा निषेध केला.


