Union Minister Prataprao Jadhav steps up for road development in Buldhana district. : बुलढाणा जिल्ह्याच्या रस्ते विकासासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव सरसावले

बुलडाणा (प्रतिनिधी ):
बुलडाणा जिल्ह्यातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि ग्रामीण भागाला मुख्य प्रवाहात जोडण्यासाठी केंद्रीय आयुषमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील प्रलंबित रस्ते कामांसाठी ‘केंद्रीय रस्ते निधी’ (CRF) अंतर्गत भरीव निधी उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली.
नांदुरा रेल्वे क्रॉसिंगचा प्रश्न मार्गी लागणार:
या भेटीदरम्यान प्रतापराव जाधव यांनी जिल्ह्यातील एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे गडकरींचे लक्ष वेधले. नांदुरा येथील रेल्वे क्रॉसिंगवर ब्रिज नसल्यामुळे जळगाव जामोद आणि संग्रामपूर या आदिवासी बहुल क्षेत्राकडे जाणाऱ्या वाहतुकीचा मोठा खोळंबा होतो. रेल्वे जाईपर्यंत नागरिकांना तासनतास ताटकळत राहावे लागते. या ठिकाणी तातडीने ओव्हरब्रिज किंवा अंडरपास निर्माण करावा, अशी मागणी त्यांनी केली. जनभावनेचा आदर करत या कामाला गती देण्याची विनंतीही त्यांनी यावेळी केली.
“रस्ते हे विकासाचे महामार्ग आहेत. कृषी, उद्योग आणि व्यापाराला गती देण्यासाठी आधुनिक रस्त्यांची गरज आहे,” असे मत प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केले. ना. नितीन गडकरी यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. या भेटीमुळे जिल्ह्यातील अनेक रस्ते प्रकल्पांना आता गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.


