Engineer Sharad Kharat Appointed as District Organization Contact Chief for the RPI (Athawale Faction) in Buldhana District. : रिपाई आठवले गट बुलडाणा जिल्हा संघटन संपर्क प्रमुखपदी इंजिनियर शरद खरात यांची वर्णी

बुलडाणा (प्रतिनिधी):-
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षाची पाळेमुळे जिल्ह्यात अधिक घट्ट करण्यासाठी आणि पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. डॉ. रामदासजी आठवले यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देऊळगाव राजा येथील निष्ठावंत कार्यकर्ते इंजिनियर शरद खरात यांची ‘बुलडाणा जिल्हा दक्षिण (घाटावरील) व उत्तर (घाटाखालील)’ संपूर्ण जिल्हा संघटन संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
निष्ठा आणि कार्याची पावती
इंजिनियर शरद खरात हे डॉ. रामदासजी आठवले यांचे खंबीर समर्थक मानले जातात. “मोडेल पण वाकणार नाही” या बाण्याने, सत्तेत असो वा नसो, कोणतीही लालसा न ठेवता त्यांनी जिल्ह्यात रिपाईचा झेंडा फडकवत ठेवला आहे. त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत खुद्द ना. डॉ. रामदासजी आठवले यांनी ही नियुक्ती जाहीर केली.
जिल्हा संपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव यांनी डॉ. आठवले यांच्या आदेशाचे पालन करत, इंजिनियर शरद खरात यांना निवडीचे अधिकृत पत्र प्रदान केले. यावेळी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला आणि पुढील राजकीय प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव
समाजसेवा हेच राजकारण मानणारे आणि गरजूंच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून शरद खरात यांची ओळख आहे. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील रिपाई कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या नियुक्ती प्रसंगी रिपाइं आठवले गटाचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
इंजिनियर शरद खरात यांच्या निवडीबद्दल राजकीय आणि सामाजिक स्तरावरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


