Dilapidated Condition of the Dhad-Jamthi-Devpur Phata Road : धाड-जामठी-देवपूर फाटा रस्त्याची दूरवस्था.रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

बुलढाणा प्रतिनिधी :
धाड ते देवपूर फाटा मार्गे जामठी या प्रमुख रस्त्याच्या अत्यंत दयनीय अवस्थेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून जिल्हा उपाध्यक्ष मनोजभाऊ दांडगे यांच्या नेतृत्वाखाली आज कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) कार्यालयावर धडक दिली. रस्त्याच्या तातडीच्या मजबुतीकरणासह रुंदीकरणाच्या मागणीसाठी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषत घाट परिसरात मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वर्षभरापूर्वी करण्यात आलेले खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. परिणामी, अल्पावधीतच रस्ता पुन्हा खराब होऊन प्रवाशांसाठी धोकादायक बनला आहे.
याशिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूंना साईड पट्ट्या न भरल्यामुळे वाहन चालविणे अधिकच कठीण झाले आहे. रात्रीच्या वेळी तर परिस्थिती अधिकच गंभीर बनत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. या मार्गावरून दररोज शेकडो नागरिक, विद्यार्थी आणि शेतकरी प्रवास करतात, त्यामुळे हा रस्ता तातडीने दुरुस्त करणे गरजेचे असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मनोजभाऊ दांडगे यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. या रस्त्याबाबत यापूर्वी अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असून प्रशासन मात्र निष्क्रिय आहे. जर पुढील एक महिन्याच्या आत रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम सुरू झाले नाही, तर २० एप्रिल २०२६ रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीस प्रशासनच जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आता प्रशासन या निवेदनाची दखल घेऊन तातडीने कामाला सुरुवात करते की आंदोलनाची वेळ येते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.


