Three farmers consumed poison in front of land records staff : शेतमोजणीची तारीख पुढे न ढकलल्यामुळे तीन शेतकऱ्यांनी संग्रामपूर तालुक्यातील मारोड शिवारात सोमवारी दुपारी विषारी औषध प्राशन केले.

शेत मोजणीची नोटीस ऐन वेळेवर दिल्याने संताप
बुलढाणा : शेत मोजण्यासाठी दिलेली नोटीस ऐन वेळेवर मिळाल्याने पुढील तारीख देण्याची केलेली विनंती अमान्य करीत भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी मोजणीसाठी हजर झाले. यामुळे संतप्त तीन शेतकऱ्यांनी संग्रामपूर तालुक्यातील मारोड शिवारात सोमवारी दुपारी विषारी औषध प्राशन केले.
गजानन राजाराम ढोले (वय ६५), विठ्ठल ढोले (६०) व रवींद्र ढोले (३५) अशी एकाच कुटुंबातील विषबाधित शेतकऱ्यांची नावे आहेत. संग्रामपूर तहसील कार्यालयात न्यायप्रविष्ट असलेल्या शेतजमीन प्रकरणी शेताची मोजणी करण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयाने शेतकऱ्याला मोजणीच्या दोन दिवसाआधी नोटीस दिली. शेतकऱ्यांनी मोजणीची तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली. मात्र शेतकऱ्यांचे काही न ऐकताच भूमिअभिलेख विभागाचे कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी शेतात पोहोचले.
शेताची मोजणी पुढच्या तारखेत करावी, अशी मागणी करीत गजानन ढोले, विठ्ठल ढोले व मुलगा रवींद्र ढोले या पिता, पुत्र व भावाने विष घेतले.
या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तिघांनाही तातडीने वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथून शेगाव ते हलविण्यात आले.


