A young man died in a pothole : मेहकर ते जानेफळ मार्गावर खड्ड्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला.

मेहकर – जानेफळ मार्गावर अपघातात तरुण ठार
मेहकर : मेहकर ते जानेफळ मार्गावर खड्ड्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला. २७ मार्चच्या दुपारी अडीच वाजता दुचाकीने मेहकरकडून जानेफळकडे जाणाऱ्या युवकाला स्विफ्ट डिझायर कारने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. खड्ड्यामुळे हा अपघात घडल्याचे नागरिकांनी सांगितले.
धनंजय गिरे (वय ३५) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. जानेफळ येथील रहिवासी असलेला धनंजय आपल्या दुचाकीने जानेफळकडे निघाला होता. समोरून भरधाव वेगाने आलेल्या स्विफ्ट डिझायर कार (क्रमांक एमएच-१९-एएक्स-७२३३) ने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात धनंजय गिऱ्हे गंभीर जखमी झाला. त्यातच त्याची प्राणज्योत मालवली.
घटनेची माहिती समजताच मेहकर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला.
मेहकर ते जानेफळ मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. खड्डे चुकविण्यासाठी वाहनधारकांना रॉंग साइड वाहन टाकावे लागते. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मात्र, याकडे राज्य रस्ते विकास महामंडळ कोणतेही लक्ष देत नसल्याचा आरोप होत आहे.


