Administrative Crackdown: Criminal Case Filed Against Petrol Pump Owner : प्रशासनाचा दणका; चिखलीत नियमांचे उल्लंघन करून इंधन विक्री करणाऱ्या पेट्रोल पंप मालकावर फौजदारी गुन्हा दाखल

बुलढाणा :
जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासकीय नियमांचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विशेष खबरदारी घेतली जात आहे. जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या आदेशानुसार, सर्व पेट्रोल पंपांवर इंधन केवळ वाहनांच्या इंधन टाकीतच वितरित करणे बंधनकारक असून कॅन, बाटली किंवा इतर उघड्या कंटेनरमध्ये इंधन देणे सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रतिबंधित करण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आता प्रशासनाने कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.
चिखली येथील जालना रोडवर असलेल्या रेणुका पेट्रोल पंप येथे दि. २६ मार्च २०२६ रोजी प्रशासकीय सूचनांकडे दुर्लक्ष करून अनधिकृतपणे खुल्या टाक्या आणि बाटल्यांमध्ये (Open Tank/Containers) इंधन विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. अशा प्रकारच्या बेकायदेशीर विक्रीमुळे सार्वजनिक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन तहसील कार्यालय चिखली येथील पुरवठा निरीक्षक रविंद्र संजय वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिखली पोलीस ठाण्यात संबंधित पेट्रोल पंप मालकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम २२३ आणि २८७ अन्वये ही कारवाई करण्यात आली असून पोलीस हवालदार कैलास गोपाळराव चाटारकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
प्रशासनाकडून जनतेला आवाहन करण्यात येते की, इंधन पुरवठा पुरेसा असून नागरिकांनी विनाकारण साठवणूक करू नये. तसेच, सर्व पेट्रोल पंप चालकांनी शासनाने ठरवून दिलेल्या सुरक्षा नियमांचे पालन करूनच इंधन वितरण करावे. नियमांचे उल्लंघन करून सार्वजनिक सुरक्षेला बाधा पोहोचवणाऱ्या घटकांवर यापुढेही कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.


