Awareness of the schemes of the Social Justice Department : सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा जागर तीन दिवसीय मल्टीमीडिया प्रदर्शनाची सांगता.

बुलढाणा : शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय ‘मल्टीमीडिया’ प्रदर्शनाचा आज उत्साहात समारोप झाला. शासनाच्या योजना केवळ कागदावर न राहता त्या सर्वसामान्यांपर्यंत दृकश्राव्य माध्यमातून पोहोचवण्याचा हा प्रयत्न अत्यंत स्तुत्य आहे, अशी भावना शेगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी जयश्री काटकर यांनी यावेळी व्यक्त केली.
जिल्हा माहिती कार्यालय आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेगाव येथील नगर परिषदेच्या श्यामाप्रसाद मुखर्जी नगर भवनात २८ ते ३० मार्च दरम्यान हे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाला विद्यार्थी व नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.
या प्रदर्शनाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक न्याय विभागाच्या सर्व महत्त्वपूर्ण योजनांची माहिती अत्यंत आकर्षक आणि चित्रमय स्वरूपात मांडण्यात आली होती. यामध्ये योजनेचे स्वरूप, मिळणारा लाभ, आवश्यक पात्रता, अर्जाची प्रक्रिया आणि संपर्क केंद्र याबद्दलची सविस्तर माहिती फलकांद्वारे (पॅनल) देण्यात आली.
प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी शेगावचे नायब तहसीलदार विजय सुरडकर, ज्येष्ठ पत्रकार दिनेश महाजन, राजकुमार व्यास, अनिल उंबरकर, धनराज ससाने यांच्यासह विविध महिला बचत गटांच्या महिला, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजनेतून जिल्हा माहिती कार्यालयाने आयोजित केलेल्या या उपक्रमामुळे शासकीय योजनांच्या प्रसिद्धीला नवी दिशा मिळाली असून, प्रशासनाच्या या कार्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.


