Giant honeybees claim a farmer’s life. : आग्यामोहोळाच्या मधमाशांनी घेतला शेतकऱ्याचा बळी

विहिरीत उडी घेऊन मजुराने केला बचाव
बुलढाणा : तालुक्यातील पळसखेड भट येथे आग्यामोहोळाच्या मधमाशांनी एका शेतकऱ्याचा बळी घेतला. शेतात काम करीत असताना मजुरासह शेतकऱ्यावर मधमाशांनी जोरदार हल्ला चढविला. शेकडो मधमाशांनी कडाडून चावे घेतल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर मजुराने विहिरीत उडी घेऊन आपला जीव वाचविला. ३१ मार्चच्या सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
पळसखेड भट येथील रहिवासी असलेले सोहम ज्ञानदेव सुरोशे (वय ६५) यांचे शेत गाव शिवारात आहे. सोहम सुरोशे हे ३१ मार्च रोजी सकाळी गावातीलच सचिन निकाळजे (वय ३०) याच्यासोबत शेतात कामासाठी गेले होते. सकाळी अकरा वाजेदरम्यान आग्यामोहोळाच्या मधमाशांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. जीव वाचविण्यासाठी दोघेही धावू लागले. यातील निकाळजे याने विहिरीत उडी घेऊन आपला जीव वाचविला. मात्र, पाण्यावरही मधमाशा घोंगावत होत्या. पोहत पाण्यावर डोके खाली वर करीत त्याने स्वत:चे संरक्षण केले. मधमाशा शांत झाल्यानंतर दोन ते अडीच तासांनी बाहेर येऊन सचिन घरी निघून गेला.
इकडे मधमाशांनी कडाडून चावे घेतलेले सोहम सुरोशे घायाळ होऊन मृत्युमुखी पडले. दुपारच्या वेळी नातेवाइकांसह ग्रामस्थांनी शोध घेतल्यानंतर ते नदीजवळच्या एका जाळीत आढळून आले. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांची प्राणज्योत मालवल्याचे सांगितल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.


