Deadline for Online Applications for Agricultural Awards Extended Until April 15 : कृषी पुरस्कारांसाठी ऑनलाईन अर्जास 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

बुलढाणा : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत सन 2025 साठी विविध कृषी पुरस्कारांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास 15 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2026 होती.
राज्यातील शेती व पूरक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, महिला, व्यक्ती व संस्थांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडित, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), युवा शेतकरी तसेच पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न आदी पुरस्कारांचा समावेश आहे.
यंदा प्रथमच कृषी विभागाने अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात सुरू केली आहे. यासाठी स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली असून कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर “कृषी पुरस्कार” या टॅबमध्ये अर्ज सादर करता येत आहेत. या प्रणालीमुळे अर्ज सादरीकरण, तपासणी, मूल्यांकन व अहवाल निर्मिती प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक व वेळबद्ध होणार आहे.
दरम्यान, ऑनलाईन प्रणालीचे हे पहिलेच वर्ष असल्याने तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांकडील चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यास वेळ लागत असल्यामुळे अनेक अर्ज प्रलंबित राहिले होते. त्यामुळे शेतकरी व क्षेत्रीय स्तरावरून मुदतवाढीची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 15 एप्रिल 2026 पर्यंत वाढविली आहे. तरी इच्छुक शेतकरी, व्यक्ती व संस्थांनी दिलेल्या मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.


