Summer Sports and Personality Development Camp Enthusiastically Inaugurated at Buldhana Sports Complex: बुलढाणा क्रीडा संकुलात ग्रीष्मकालीन क्रीडा व व्यक्तिमत्व विकास शिबिराचा उत्साहात शुभारंभ.

बुलढाणा: उन्हाळी सुटीचा सकारात्मक उपयोग करून विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम वाढवणे आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास घडवणे हा ‘ग्रीष्मकालीन क्रीडा व व्यक्तिमत्व विकास शिबिरा’चा मुख्य उद्देश असून, अशा शिबिरांतून भविष्यात उत्कृष्ट खेळाडू घडतील, असा विश्वास जिल्हा कारागृह अधीक्षक मेघा बाहेकर यांनी व्यक्त केला.
जिल्हा क्रीडा संकुल, जाभरून रोड येथे १ ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीत आयोजित शिबिराचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. क्रीडा व युवक सेवा संचालनालय (पुणे), जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा स्काऊट अँड गाईड अधिकारी कविता पवार व सुनील जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
मेघा बाहेकर यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन करताना क्रीडेसोबतच शिस्त, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. तर कविता पवार यांनी या शिबिरातून विद्यार्थ्यांमध्ये खेळाची गोडी निर्माण होऊन त्यांनी संधीचा पूर्ण लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

शिबिरातील उपक्रम:
प्रास्ताविकात जिल्हा क्रीडा मार्गदर्शक उज्वला लांडगे यांनी शिबिराची रूपरेषा स्पष्ट केली. या शिबिरात ॲथलेटिक्स, हॅण्डबॉल, फुटबॉल, खो-खो, कबड्डी, जिम्नॅस्टिक्स, स्पोर्ट्स नर्सरी यांसारख्या मैदानी खेळांसोबतच वक्तृत्व, चित्रकला, वादविवाद, सामान्य ज्ञान, सुंदर हस्ताक्षर, नृत्य, ॲरोबिक्स, लाठीकाठी, प्राणायाम तसेच दंतचिकित्सा व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे.
हे शिबिर दोन सत्रांत पार पडणार असून सकाळी ६.१५ ते ८.१५ आणि सायंकाळी ५.०० ते ७.०० या वेळेत प्रशिक्षण दिले जाणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जीवन मोहोड यांनी केले, तर आभार प्रदर्शन उज्वला लांडगे यांनी केले. जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वी करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.


