Pistol sale; Three smugglers caught by LCB : देशी बनावटीचे पिस्तूल विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या तीन तस्करांना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी १ एप्रिलला धाड घालून अटक केली. आरोपींच्या ताब्यातून पिस्तूल, दोन जिवंत काडतुस व दुचाकी जप्त करण्यात आली.

जळगाव जामोद परिसरात आवळल्या आरोपींच्या मुसक्या
जळगाव जामोद : येथील श्रीमंत ढाब्यावर बसून देशी बनावटीचे पिस्तूल विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या तीन तस्करांना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी १ एप्रिलला धाड घालून अटक केली. आरोपींच्या ताब्यातून पिस्तूल, दोन जिवंत काडतुस व दुचाकी जप्त करण्यात आली.
पोलिसांनी पवन इंदरसिंग डावर (वय २३), संजय भिलासिंग बोडल (वय २०) दोघे रा. राजुरा बुद्रुक व रमेश दुर्गासिंग बारेला (वय २४) रा. ईस्लामपूर ता. जळगाव जामोद अशी अटकेतील पिस्तूलतस्करांची नावे आहेत. या आरोपींविरुद्ध जळगाव जामोद पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट कलम ३, ५ सहकलम १२३, १३५ महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आगामी सण, उत्सवांच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस दला कडून खबरदारीच्या सर्वतोपरी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मध्य प्रदेशला लागून असलेल्या सोनाळा, तामगाव, जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीत देशी बनावटीचे अग्नीशस्त्र (पिस्टल), काडतुसे व इतर हत्यारांची तस्करी, खरेदी-विक्री तसेच अशी अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्या आरोपींचा शोध घेतला जात आहे.
पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी पोलीस अधिकारी व अंमलदारांची पथके तयार करून शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, १ एप्रिल रोजी जळगाव जामोद हद्दीतील श्रीमंत ढाब्यावर काही जण पिस्तूलची विक्री करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व पीआय सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात पीएसआय अविनाश जायभाये, पोहेकॉ दीपक लेकुरवाळे, शेख चाँद, गणेश पाटील, आशा मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.


