Gas mafia busted in Chhatrapati Sambhajinagar : गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी शिवार परिसरात गॅस चोरीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले. यात १ कोटी २६ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

२,४८० गरीब कुटुंबांच्या हक्काचा गॅस चोरणाऱ्या आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश : राज्यस्तरीय दक्षता पथकाची जिगरबाज कारवाई
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील इंधन चोरी आणि अवैध साठेबाजी करणाऱ्यांविरोधात राज्यस्तरीय दक्षता पथकाने ‘झिरो टॉलरन्स’ धोरण अवलंबत २ एप्रिल २०१६ रोजी रात्री एक मोठी कारवाई केली. गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी शिवार परिसरात गॅस चोरीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले. यात १ कोटी २६ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्यस्तरीय दक्षता पथक प्रमुख (नियंत्रक शिधावाटप) चंद्रकांत डांगे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, पथकप्रमुख गणेश बेल्लाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वैजापूर रोडवरील हॉटेल साईयश जवळील मोकळ्या जागेत सापळा रचला. २ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास एच.पी. कंपनीच्या एलपीजी टँकरचे सील तोडून अत्यंत धोकादायक पद्धतीने गॅसची चोरी सुरू असताना पथकाने धाड टाकली आणि दोन संशयितांना ताब्यात घेतले. सर्वसामान्यांच्या हक्कावर गदा आणणारा हा प्रकार आहे. या कारवाईचे गांभीर्य स्पष्ट करताना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, जप्त करण्यात आलेला गॅस साठा तब्बल २ हजार ४८० गरीब कुटुंबांची महिनाभराची गरज भागवू शकला असता. गॅसमाफिया स्वतःच्या फायद्यासाठी सर्वसामान्यांच्या हक्काच्या इंधनाचा काळाबाजार करत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
जप्त केलेला माल
दोन महाकाय टँकर : क्र. MH 43 K 5921 आणि MH 43 CK 5747 (एकूण ३५,२२० किलो गॅस).
सिलिंडर साठा : व्यावसायिक (१९.२ किलो) आणि घरगुती (१४.२ किलो) अशा एकूण २६ सिलिंडरचा अवैध साठा.
एकूण किंमत : अंदाजे १ कोटी २६ लाख रुपये.
कडक कायदेशीर पावले
या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या रॅकेटचे धागेदोरे कुठपर्यंत पसरले आहेत, याचा सखोल तपास आता पोलीस यंत्रणेमार्फत केला जात आहे.
अवैध साठेबाजी आणि जीवनावश्यक वस्तूंची चोरी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. ही मोहीम यापुढेही अधिक तीव्र केली जाईल.
चंद्रकांत डांगे, भाप्रसे राज्यस्तरीय दक्षता पथक प्रमुख


