Young Man Dies After Being Electrocuted : खैरखेड येथे टिनपत्रे काढताना दुर्दैवी घटना

सिंदखेड राजा : गुरांचा गोठा सुस्थितीत करण्यासाठी टिनपत्रे काढत असतानाच समोरील वीज वाहिनीला स्पर्श होऊन एका तरुणाचा मृत्यू झाला. तालुक्यातील खैरखेड येथे ४ एप्रिल २०२६ रोजी ही दुर्घटना घडली.
अरविंद गंगाधर वाघ (वय २७) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. खैरखेड येथे ३ एप्रिलला वादळ आले होते. ४ एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजता आपल्या घरासमोरील गुरांच्या गोठ्यावरील टिनपत्रे व्यवस्थित लावण्याचे काम अरविंद वाघ करीत होता. टिनपत्रा उचलला असता घराजवळून गेलेल्या विद्युत वाहिनीच्या संपर्कात येऊन त्याला जोरदार धक्का बसला. या दुर्घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.
ग्रामस्थांच्या माहितीनुसार घराच्या अगदीच जवळून ११ केव्ही वीजवाहिनी गेली असून, वीज तार ढिल्या होत्या. याबाबतच्या तक्रारी महावितरणकडे करण्यात आल्या होत्या. मात्र, महावितरणच्या हलगर्जीनेच अरविंदचा बळी गेला, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
दरम्यान, किनगाव राजा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. यानंतर दुपारी अरविंदवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.


