Young woman hangs herself : होणाऱ्या नवऱ्याला पाठवून देईल, अशा धमक्या देत त्रास दिल्यामुळे तसेच होणाऱ्या सासरकडील लोकांनी लग्न मोडल्याने एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

भावी संसारही तुटला
जळगाव जामोद : माझ्यासोबत लग्न कर नाहीतर तुझे फोटो तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला पाठवून देईल, अशा धमक्या देत त्रास दिल्यामुळे तसेच होणाऱ्या सासरकडील लोकांनी लग्न मोडल्याने एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पळशी सुपो येथे ४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गायत्री (वय २१) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तर तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपीचे नाव गौरव खंडारे असे आहे. याप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०८, ३५१ (२) नुसार गुन्हे दाखल केले.
जळगाव जामोद तालुक्यातील पळशी सुपो येथील गायत्रीचे लग्न ९ मे २०२६ रोजी ठरले होते. गावातीलच गौरव खंडारे (वय २२) याच्याकडे तिचे फोटो होते, असे तिने काका व तिच्या आईला सांगितले होते. त्यावेळी गौरवला समजावून सांगितले होते. गायत्रीच्या लग्नाबाबत माहिती समजल्यानंतर आरोपी गौरव याने तिला त्रास देणे सुरू केले. ‘माझ्याशी लग्न कर नाही तर तुझे माझ्यासोबतचे फोटो तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला पाठवून देईल’ अशा वारंवार धमक्या दिल्या. गौरव खंडारेच्या बाबतीत माहिती समजल्यानंतर होणाऱ्या सासरच्या लोकांनी लग्न मोडले.
गौरव त्रास देत असल्याने तसेच होणारे लग्न मोडल्यामुळे हताश झालेल्या गायत्रीने ४ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास खोलीचा दरवाजा आतून बंद केला. दरवाजा तो ठोठावूनही काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शटर वर करून पाहिले असता गायत्री गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. गौरव खंडारे यांच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची तक्रार काकाने जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली.
ही राजकीय घडामोड वाचायची सोडू नका...
डीएड केले होते पूर्ण
गायत्रीने डीएडचे शिक्षण पूर्ण केले होते. ती जळगाव जामोद येथे कॉम्प्युटरचा क्लास करीत होती. मात्र, मध्येच गौरव याने तिच्या भावी आयुष्यात विष कालवले. परिणामी गायत्रीला आपला जीव गमवावा लागला.


