- Teacher Mantode suspended for sexually harassing female students : विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करणारा वासनांध शिक्षक महादेव आत्माराम मानतोडे याला शिक्षण विभागाने तडकाफडकी निलंबित केले.
लोणीच्या शाळेतील घटनेने जिल्हाभर संताप


बुलढाणा : मेहकर तालुक्यातील लोणी गवळी येथे शाळेत विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करणारा वासनांध शिक्षक महादेव आत्माराम मानतोडे याला शिक्षण विभागाने तडकाफडकी निलंबित केले.
लोणी गवळी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या तीन मुलींचा महादेव मानतोडे याने विनयभंग केला. गेल्या काही महिन्यांपासून हा शिक्षक त्याच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या काही मुलींसोबत घाणेरडे कृत्य करीत होता. या लैंगिक छळाबाबत कोणाला काही सांगितल्यास खिचडीमध्ये विष टाकेल, अशा धमक्या तो मुलींना देत असे. यामुळे भयभीत होऊन चिमुकल्या मुली काही सांगत नव्हत्या. ७ एप्रिल रोजी या विकृताने तीन मुलींसोबत लैंगिक चाळे केले. शिक्षक मानतोडे अश्लीलतेचा कळस गाठून त्रास देत असल्यामुळे मुली शाळेत जायला घाबरत होत्या. शिक्षकाच्या या कृत्याबद्दल माहिती समजताच संतप्त पालकांनी सकाळी दहा वाजता शाळा गाठून शिक्षकास चोप दिला.
लोणी गवळी येथे राडा झाल्याची माहिती समजताच डोणगावचे ठाणेदार अमरनाथ नागरे पोलिस ताफा घेऊन पोहचले. उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खाडे तसेच राखीव पोलीस दलसुद्धा लोणी गवळी येथे दाखल झाले. पोलिसांनी गावकऱ्यांची समजूत काढली. तसेच आरोपी शिक्षकाला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हे नोंदविले.
शिक्षकाचे कृत्य हे माफीलायक नाही. शिक्षण विभागाने महादेव मानतोडे यास तडकाफडकी निलंबित केले.


