Maha-Mock Drill on LPG Gas Leakage in Khamgaon MIDC : खामगाव येथे एलपीजी गॅस टँकर गळती संदर्भात एक भव्य ‘मॉकड्रिल’ (रंगीत तालीम) यशस्वीरित्या पार पडले.


जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती सज्जतेची मोठी चाचणी : विविध यंत्रणांचा उत्स्फूर्त सहभाग
बुलढाणा : औद्योगिक क्षेत्रात अचानक उद्भवणाऱ्या भीषण रासायनिक आपत्तींना तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि औद्योगिक वसाहती किती सज्ज आहेत, याची प्रत्यक्ष प्रचिती आज खामगाव येथे आली. जिल्हाधिकारी प्रवीणकुमार देवरे यांच्या आदेशानुसार आणि निवासी जिल्हाधिकारी सुरेश कव्हळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘वन एशिया नेटवर्क इंडिया प्रा. लि.’, एमआयडीसी, खामगाव येथे एलपीजी गॅस टँकर गळती संदर्भात एक भव्य ‘मॉकड्रिल’ (रंगीत तालीम) यशस्वीरित्या पार पडले.

आज सकाळी ११:३० वाजता कंपनीच्या टँकर लोडिंग परिसरात गॅस गळती झाल्याचा काल्पनिक प्रसंग निर्माण करण्यात आला. गळती लक्षात येताच कंपनी व्यवस्थापनाने तातडीने जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. या माहितीच्या आधारे जिल्हा प्रशासनाची यंत्रणा अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी दाखल होऊन कार्यान्वित झाली. या संपूर्ण मोहिमेचे संचलन व समन्वय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार तसेच औद्योगिक सुरक्षा व आरोग्य उपसंचालक अमर भोगे यांनी केले.
अग्निशमन दलाचे अग्निशमन अधिकारी नागेश रोठे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ‘वॉटर कर्टन’ तयार करून हवेतील गॅस विरळ केला. त्यानंतर पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात तातडीने नाकेबंदी करण्यात आली. संभाव्य अग्निभय टाळण्यासाठी महावितरणने परिसराचा वीजपुरवठा त्वरित खंडित केला. कंपनीच्या आपत्कालीन आराखड्यानुसार सायरन वाजवून कर्मचाऱ्यांचे सुरक्षित स्थलांतर करण्यात आले.
या सरावाचे तांत्रिक निरीक्षण करण्यासाठी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य उपसंचालक अमर पुरुषोत्तम भोगे, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त गजानन प्रल्हाद घिरके, खामगावच्या नायब तहसीलदार सोनाली भाजीभाकरे, महावितरणचे सहाय्यक अभियंता सचिन फेरण, तसेच वन एशिया नेटवर्कचे जी.एम. राजेश सिन्हा उपस्थित होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य गुलाबसिंग राजपूत आणि प्रदीप सोनवणे यांनीही मोहिमेत सक्रिय भूमिका बजावली.
मॉकड्रिलचा उद्देश
औद्योगिक क्षेत्रात एलपीजी गॅस गळतीसारखी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास, विविध शासकीय यंत्रणांमधील समन्वय आणि त्यांचा ‘रिस्पॉन्स टाइम’ (प्रतिसाद वेळ) तपासणे हा या सरावाचा मुख्य उद्देश होता. प्रत्यक्ष आपत्तीच्या वेळी गोंधळ उडू नये आणि उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करून जीवित व वित्तहानी कशी टाळावी, याचे यशस्वी प्रशिक्षण या निमित्ताने देण्यात आले.
या यशस्वी सरावामुळे खामगाव औद्योगिक परिसरातील सुरक्षिततेचा आत्मविश्वास वाढला असून, जिल्हा प्रशासनाच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.


