Union Minister of State Prataprao Jadhav’s follow-up efforts bear fruit. : केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या पाठपुराव्याला यश बुलढाण्यात ग्रामीण भागात 10 राष्ट्रीयकृत बँक शाखांना मंजुरी

बुलढाणा, दि. 11 : केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रयत्नांमुळे बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात 10 नवीन राष्ट्रीयकृत बँक शाखा सुरू करण्यास केंद्रीय अर्थ मंत्रालयाने हिरवा कंदील दिला आहे.
ग्रामीण नागरिकांना बँकिंग सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जाधव यांनी राष्ट्रीय बँक अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन ज्या गावांमध्ये शाखा नाहीत, तेथे नवीन शाखा सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर अर्थ मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
मंजुरीनुसार बुलढाणा तालुक्यातील सागवान व साखळी बुद्रुक, चिखलीतील इसोली व सवना, खामगावमधील घाटपुरी व सुटाळा खुर्द, मेहकरमधील अंजनी बुद्रुक व देऊळगाव साकर्शा, मोताळ्यातील कोथळी तसेच संग्रामपूरमधील टुनकी बुद्रुक येथे लवकरच बँक शाखा सुरू होणार आहेत.
आणखी बातम्या वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा https://mahadesha.com/
पूर्वी जिल्हा बँकेच्या शाखांमुळे शेतकऱ्यांना सहज पिक कर्ज मिळत होते; मात्र त्या शाखा बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांना खासगी सावकारांकडून जास्त व्याजाने कर्ज घ्यावे लागत होते. या पार्श्वभूमीवर नवीन बँक शाखा सुरू होणे ग्रामीण भागासाठी दिलासादायक ठरणार आहे. पुढील काळात आणखी गावांमध्येही सर्वेक्षण करून शाखा सुरू करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे.
दरम्यान, या मंजुरीबद्दल प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांचे आभार मानले आहेत.


