Knife attack on cousins over money dispute: Three seriously injured in Malkapur Pangra : पैशाच्या वादातून चुलत भावांवर चाकू हल्ला: मलकापूर पांग्रा येथे तिघे गंभीर जखमी

मलकापूर पांग्रा, (अमोल साळवे): नात्यांमधील वीण अनेकदा पैशांच्या व्यवहारांमुळे उसवते, आणि हीच कटू सत्यता सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे पुन्हा एकदा समोर आली आहे. दि. ११ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयासमोर घडलेल्या एका धक्कादायक घटनेत, मोटारसायकल आणि बीसीच्या पैशांवरून झालेल्या वादातून सख्ख्या चुलत भावांवर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जालना येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नाजिम खा शौकत खा पठाण आणि मोहसीन खा शौकत पठाण यांचा त्यांचे चुलत भाऊ फिरोज खान रजाखा पठाण, अफरोज खा रजा खा पठाण आणि साहिल खान मेहराज खान पठाण यांच्यासोबत मोटारसायकल आणि बीसीच्या पैशांवरून वाद सुरू होता. हा वाद विकोपाला जाऊन शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्यांपर्यंत पोहोचला.
वाद शांत करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच, अचानकपणे नाजिम खा शौकत खा पठाण आणि मोहसीन खान शौकत खा पठाण यांनी फिरोज खान रजाखा पठाण, साहिल खान मेहराज खान पठाण आणि अफरोज खान उर्फ रईस खा रजा खा पठाण यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांनी दाताने चावा घेऊन पोटात धारदार चाकूने भोसकून तिघांना गंभीर जखमी केले.
खालील बातमी वाचण्यासाठी लिंक ला क्लिक करा https://mahadesha.com/
या घटनेमुळे मलकापूर पांग्रा परिसरात खळबळ उडाली आहे. जखमींना तातडीने जालना येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
फिर्यादी साहिल खान मेहराज खान पठाण यांच्या तक्रारीवरून साखरखेर्डा पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड यांच्या नेतृत्वात बीट जमादार निवृत्ती पोफळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. कौटुंबिक वादातून घडलेल्या या गंभीर घटनेमुळे समाजात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पैशांच्या मोहापायी नात्यांची कत्तल करणाऱ्या या प्रवृत्तीवर अंकुश कसा बसवायचा, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


