Apsara Girl Sonali extends : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत अप्सरा गर्ल फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी मलकापूर, नांदुरा व खामगाव तालुक्यांमधील गावांना भेटी देत विशेष जनजागृतीवर भर दिला. ग्रामस्थांशी संवाद साधत गावाच्या विकासाकरिता प्रोत्साहनात्मक बळकटी दिली.

बुलढाणा : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ‘अप्सरा आली’फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी मलकापूर, नांदुरा व खामगाव तालुक्यांमधील गावांना भेटी देत विशेष जनजागृतीवर भर दिला. ग्रामस्थांशी संवाद साधत गावाच्या विकासाकरिता प्रोत्साहनात्मक बळकटी दिली.
मलकापूर तालुक्यातील अनुराबाद, नांदुऱ्यामधील धानोरा आणि खामगावमधील कठोरा या गावांची सोनाली कुलकर्णी यांनी पाहणी केली. गावांचा सर्वांगीण विकास, लोकसहभाग आणि सक्षम ग्रामपंचायती घडविण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविले जात आहे. अनुराबाद येथे गावाच्या शेजारून वाहणाऱ्या नदीवर पाणी अडविण्यासाठी लोकसहभागातून श्रमदान केले जात आहे. सोनाली यांनीदेखील ग्रामस्थांना हातभार लावत श्रमदान केले. गावकऱ्यांनी तसेच जिजाऊ कन्या भजनी मंडळ, शाळकरी मुलींचे लेझीम पथक तसेच सनई चौघड्यांच्या सुरात स्वागत झाले. महिलांच्या सक्षमीकरणावर तसेच शिक्षणाविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. सुंदर मराठी शाळा, अंगणवाडी तसेच विविध विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.

‘समृद्ध गाव सक्षम पंचायत’ या संकल्पनेला बळ देणारा हा उपक्रम असून, शासनाच्या विविध विकास योजना थेट लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत असल्याचे सांगितले. प्रधानमंत्री घरकुल योजना, प्रधानमंत्री सोलर योजना, परस बाग इत्यादी विविध विकासकामांबद्दल माहिती करून ग्रामविकासाच्या उपक्रमांना चालना दिली. याशिवाय त्यांनी बचत गटाच्या महिला, विद्यार्थ्यांची भेट देऊन संवाद साधला. लोकसहभाग, शिक्षण, पर्यावरणपूरक उपक्रम आणि स्वयंपूर्णतेच्या माध्यमातून ग्रामसमृद्धीचे महत्त्व अधोरेखित केले. तुम्हीही तुमच्या ग्रामविकासासाठी हातभार लावा, नव्या कल्पनांना चालना द्या आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभागी होऊन आपल्या गावाला पाच कोटी रुपयांपर्यंतचे बक्षीस मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहनही त्यांनी केले.

