Unveiling of a life-size statue of a lineman : विद्युत भवन, अकोला येथे महावितरणचा कणा मानल्या जाणाऱ्या लाईनमनच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच परिमंडळातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ४५ तांत्रिक कर्मचाऱ्यांना ‘गुणवंत कामगार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र व कामगारदिनी विद्युत भवनात उभारणी
परिमंडळातील ४५ तांत्रिक कर्मचाऱ्यांचा गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मान
परिमंडळाती दिव्यांग कर्मचाऱ्यांना दुचाकीचे वितरण
बुलढाणा : महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या औचित्याने महावितरणच्या अकोला परिमंडळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्युत भवन, अकोला येथे महावितरणचा कणा मानल्या जाणाऱ्या लाईनमनच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच परिमंडळातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ४५ तांत्रिक कर्मचाऱ्यांना ‘गुणवंत कामगार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विद्युत भवन येथे आयोजित कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर लाईनमनच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी अधीक्षक अभियंता दिपक सोनोने, सहाय्यक महाव्यवस्थापक मनिष भोपळे, कार्यकारी अभियंते अजितपालसिंह दिनोरे, धीरज चव्हाण, शशांक पोंक्षे तसेच उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलकर उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्य अभियंता राजेश नाईक म्हणाले, “लाईनमन हा खऱ्या अर्थाने प्रकाशदूत आहे. रात्रंदिवस, वादळ-वारा, पाऊस अशा कोणत्याही परिस्थितीत न डगमगता तो अत्यंत धोकादायक परिस्थितीत काम करतो. त्यामुळेच ग्राहकांना अखंडित व सुरळीत वीजपुरवठा देणे शक्य होते. लाईनमन ही महावितरणची केवळ ओळखच नसून तो महावितरणचा कणा आहे. त्यामुळे लाईनमनचा पुतळा उभारण्याचे भाग्य लाभल्याचा मला विशेष आनंद आहे.”
ते पुढे म्हणाले, “वीज ही अत्यावश्यक सेवा आहे. वीज क्षेत्रात केवळ इतिहासावर जगता येत नाही. ग्राहकांचे समाधान हेच आपले ध्येय असले पाहिजे. अडचणी कितीही असल्या तरी त्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न झाले पाहिजे. आपल्या कामातून वीज ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण करणे हीच खरी सेवा आहे.”
‘गुणवंत कामगार’ पुरस्कारासाठी निवड झालेल्या ४५ कर्मचाऱ्यांमध्ये अकोला जिल्ह्यातील १४ कर्मचाऱ्यांचा समावेश असून त्यात ३ यंत्रचालक आणि ११ तंत्रज्ञ आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील २३ कर्मचाऱ्यांमध्ये ४ यंत्रचालक आणि १९ तंत्रज्ञांचा समावेश आहे. तर वाशिम जिल्ह्यातील ८ कर्मचाऱ्यांमध्ये १ यंत्रचालक आणि ७ तंत्रज्ञांचा समावेश आहे.

आपल्या नैसर्गिक दिव्यांगावर मात करत विजेसारख्या सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या परिमंडळातील २१ दिव्यांग कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे दुचाकी वाहन मंजूर झाले. दुचाकी वाहनामुळे दिव्यांग कर्मचाऱ्यांना कार्यालयात ये – जा करण्यास सोयीचे होणार असून मुख्य अभियंता यांच्या हस्ते आज ६ दुचाकी वाहनाचे वितरण करण्यात आले. यामध्ये अकोला जिल्ह्यातील ६, बुलडाणा जिल्ह्यातील ११ आणि वाशिम जिल्ह्यातील ३ दिव्यांग कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण शेलकर यांनी केले. सूत्रसंचालन यंत्रचालक संजय पुरकर यांनी केले, तर आभार सुरेंद्र क्षीरसागर यांनी मानले.


