Journalist Digambar Kankals son dies in accident : बुलढाणा येथील पत्रकार दिगंबर कंकाळ यांचा मुलगा मंगेश याचा धाड नाका परिसराच्या पुढे सैलानी रोडने सागवन शिवारात २७ मे २०२६ च्या रात्री दहा ते अकराच्या सुमारास अपघाती मृत्यू झाला.

हा अपघात नसून घातपात : वडिलांचा आरोप; पोलीस चौकशीची मागणी
बुलढाणा : येथील पत्रकार दिगंबर कंकाळ यांचा मुलगा मंगेश याचा धाड नाका परिसराच्या पुढे सैलानी रोडने सागवन शिवारात २७ मे २०२६ च्या रात्री दहा ते अकराच्या सुमारास अपघाती मृत्यू झाला. गाडीचे काहीच नुकसान न झाल्याने हा घातपात असून यासंदर्भात पोलीस तक्रार करणार असल्याचे पत्रकार कंकाळ यांनी सांगितले.
मंगेश दिगंबर कंकाळ (वय २५) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. १ मे २०२६ रोजी त्याचे लग्न झाले होते. सुखी संसाराची स्वप्ने रंगवित असतानाच काळाने त्याला हिरावून नेले. या दुर्दैवी घटनेमुळे कंकाळ कुटुंबीयांवर मोठे दुःख कोसळले आहे. मंगेशची पत्नी, आई, वडील आणि बहीण यांनी एकच आक्रोश केला.
मंगेश कंकाळ हा मित्रांसोबत धाड परिसरात लग्नानिमित्त गेल्याचे सांगण्यात येत आहे. सैलानी मार्गाने सागवन शिवारामध्ये रात्री दोन मित्रांसोबत तो एमएच-२८-बीटी-२०८० क्रमांकाच्या दुचाकीने परत येत होता. मात्र, मध्येच अपघात झाला. यामध्ये मंगेशचा मृत्यू झाला. सोबतच्या एकाला दुखापत झाली असून तो जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे. तर तिसरा मित्र अपघातानंतर निघून गेला. सध्या तो घरी असून त्याला किरकोळ दुखापत झाल्याचे समजते. यातील एक मित्र क्रांतीनगरमधील तर दुसरा गायनंबर सागवनमधील रहिवासी असल्याची माहिती आहे.
अपघातानंतर दुचाकीची अवस्था पाहिली तर काही नुकसान झालेले नाही. हा अपघात नसून त्याचा घातपात झाल्याची शक्यता मंगेशचे वडील दिगंबर कंकाळ यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी कंकाळ यांनी केली आहे.


