Teacher Eligibility Test on June 28; 7,174 candidates to appear for the exam. : शिक्षक पात्रता परीक्षा 28 जून रोजी, 7174 विद्यार्थी देणार परीक्षा

निकोप व पारदर्शकपणे परीक्षा पार पाडण्याचे मा. जिल्हाधिकारी यांचे निर्देश
बुलढाणा : प्राथमिक शिक्षकाची नोकरी मिळवण्यासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET परीक्षा रविवार दि. 28 जून रोजी आयोजित करण्यात आलेली असून या परीक्षेला बुलढाणा जिल्हयातून 7174 विदयार्थी बसणार आहेत. परीक्षेसाठी बुलढाणा शहर व परिसरातील 22 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहेत.
विदयार्थी व शिक्षकांच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्वाची असलेली ही परीक्षा निकोप व पारदर्शक पणे पार पाडावी असे निर्देश TET परीक्षा आयोजन व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणेस दिले आहे.
इयत्ता 1 ते 5 पेपर क्रमांक 1 साठी 5153 परीक्षार्थी व इयत्ता 6 ते 8 पेपर क्रमांक 02 साठी 7174 परीक्षार्थी प्रविष्ठ झालेले आहेत. TET परीक्षा आयोजन व संनियंत्रण समितीची सभा दिनांक 21/05/2026 रोजी जिल्हाधिकारी यांचे दालनात संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी मा.प्रविण देवरे यांनी परीक्षेला पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देणेबाबत तसेच परीक्षा केंद्राना सी.सी.टी.व्ही. बसवणे, गोपनीय साहित्य ठेवण्यासाठी जिल्हा कोषागार येथे व्यवस्था करणे परीक्षेसाठी आवश्यक तो कर्मचारी वर्ग नेमणुक करणे बाबत सुचना दिल्या सदर बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी, शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचे प्रतिनिधी, शिक्षणाधिकारी योजना वैशाली ठग, शिक्षणाधिकारी प्राथमिक विकास पाटील व प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलढाणा मारोती गायकवाड तसेच जिल्हा कोषागार अधिकारी राठोड उपस्थित होते.


