mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

गुटखा माफियांवर वज्रप्रहार : A crushing blow to the Gutkha mafia.

शेअर करा :

A crushing blow to the Gutkha mafia. : गुटखा माफियांवर वज्रप्रहार; व्यसनाधीनांचा आक्रोश, जनतेचा आनंद

A crushing blow to the Gutkha mafia.


अमोल साळवे

मलकापूर पांग्रा : बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) गुटखा विक्रीविरोधात छेडलेल्या धडक मोहिमेमुळे अवैध गुटखा व्यवसायाची साखळी मोठ्या प्रमाणात खंडित झाली आहे. या कारवाईमुळे गुटख्याच्या व्यसनाधीन व्यक्तींना तात्पुरता त्रास होत असला तरी, अनेक घरांमध्ये मात्र समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुटख्याच्या विळख्यात अडकलेल्या कुटुंबांसाठी, विशेषतः महिलांसाठी, ही कारवाई एक मोठा दिलासा ठरली आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार, जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. या मोहिमेमुळे गुटख्याचे मोठे साठे उघडकीस आले असून, अवैध व्यापार करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गावोगावी आणि शहरांमध्ये गुटखा मिळणे कठीण झाल्याने, अनेक व्यसनाधीन व्यक्तींनी व्यसनमुक्तीच्या दिशेने पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे.

 

गुटख्याच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागते. या कारवाईमुळे या समस्यांवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता येत असल्याने, नागरिक या मोहिमेचे कौतुक करत आहेत. व्यसनामुळे होणारे शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम टाळण्यासाठी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.

 

मात्र, या कारवाईनंतरही काही ठिकाणी गुटख्याची गुप्तपणे विक्री सुरू असल्याची चर्चा आहे. काही विक्रेते केवळ ओळखीच्या ग्राहकांनाच गुटखा उपलब्ध करून देत असून, तोही नेहमीपेक्षा चढ्या दराने विकला जात आहे. थेट दुकानातून विक्री न करता, विश्वासातील व्यक्तींमार्फत किंवा ठराविक संकेतांद्वारे हे व्यवहार होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गुटखा सहज मिळत नसला तरी, काही व्यसनी व्यक्ती अधिक पैसे मोजून तो मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

आणखी बातम्या वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा https://mahadesha.com/

नागरिकांच्या मते, अवैध गुटखा विक्री पूर्णपणे बंद करण्यासाठी सध्या सुरू असलेल्या कारवाईची व्याप्ती आणखी वाढवण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील तरुणांनीही “व्यसनमुक्त गाव, समृद्ध गाव” हा संकल्प पुढे नेत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे गुटख्याच्या अवैध व्यापाराला मोठा आळा बसला असला तरी, उर्वरित गुप्त नेटवर्कवरही कठोर कारवाई झाल्यास व्यसनमुक्त समाजाच्या दिशेने आणखी मोठे पाऊल पडेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. ही मोहीम केवळ गुटखाबंदीपुरती मर्यादित न राहता, समाजाला व्यसनमुक्त करण्याच्या व्यापक उद्दिष्टाकडे घेऊन जाणारी ठरावी, अशी आशा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top