Formation of a new School Management Committee at Dhad Zilla Parishad High School. : धाड जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये नवीन शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना; सर्वानुमते पदाधिकाऱ्यांची निवड

बुलढाणा, दि. ७ : तालुक्यातील नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी ओळख असलेल्या जिल्हा परिषद हायस्कूल, धाड येथे शासनाच्या निर्देशानुसार नवीन शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली. पालकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सर्वानुमते पदाधिकाऱ्यांची निवड झाल्याने शाळेच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित बैठकीत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पालकांमधून समितीची निवड करण्यात आली. मराठी व उर्दू माध्यमातील एकूण १७ तुकड्यांमधून १७ सदस्यांची निवड करण्यात आली.
यानंतर झालेल्या बैठकीत उज्वला राजेंद्र गायकवाड यांची शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी, तर दिलीपराव उबाळे यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. उपस्थित पालकांनी टाळ्यांच्या गजरात नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
नवीन समितीच्या माध्यमातून शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, पायाभूत सुविधा आणि पालक-शाळा समन्वय अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
संपूर्ण निवड प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी जिल्हा परिषद हायस्कूल, धाड येथील मुख्याध्यापक तसेच मराठी व उर्दू माध्यमातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित पालकांनीही नव्या समितीकडून शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अपेक्षा व्यक्त केल्या.

