Police anti-robbery squads conduct mobile patrols on the ‘Samruddhi’ (Expressway). : ‘समृद्धी’वर पोलिसांच्या दरोडाविरोधी पथकांचा फिरता पहारा

बुलढाणा पोलिस अधीक्षकांकडून सुरक्षिततेचे पाऊल : ८७ किलोमीटर परिसरात बंदूकधारींवर जबाबदारी
आसिफ शाह
मेहकर : समृद्धी महामार्गावर दरोडा, लुटमार, चोऱ्यांच्या घटनांची वाहनधारकांना प्रचंड धास्ती बसली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात समृद्धीवर भरदिवसा लुटमार करणाऱ्या टोळीमुळे दहशतीचा मोठा धडा मिळाला. शासनस्तरावर सुरक्षिततेच्या उपाययोजना होतील तेव्हा होतील, पण बुलढाण्याचे पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांनी बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीतून जाणाऱ्या ८७ किलोमीटर अंतराच्या मार्गावर खबरदारी घेत प्रवाशांना निर्भयपणे प्रवास करता यावा यासाठी दोन विशेष गस्ती पथके नेमली आहेत. दरोडाविरोधी पथकामध्ये एक अधिकारी व तीन अंमलदार शस्त्रास्त्र घेऊन फिरता पहारा देणार आहेत.
विशेष गस्ती पथकांसाठी पोलिस दलाच्या वतीने दोन सुसज्ज वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ३० ऑगस्ट रोजी या वाहनांचा पोलिस अधीक्षक तांबे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या लोकार्पण सोहळ्याला अप्पर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड, देऊळगाव राजाचे उपविभागीय पोलिस अधिकारी ठोसरे, मेहकरचे ठाणेदार व्यंकटेश आलेवार, पोलीस उपनिरीक्षक गणेश कड यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

७५० किलोमीटर अंतर असलेला नागपूर ते मुंबईला अतिवेगाने जवळ करणारा हा मार्ग आहे. मुंबई – नागपूरसाठी बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती ठिकाणी येतो. या जिल्ह्यातून जाताना वाहनधारकांना ८७ किलोमीटरचा पल्ला गाठावा लागतो. या मार्गादरम्यान अनेक ठिकाणी रेती तस्करांसह चोर, दरोडेखोरांनी संरक्षक जाळ्या तोडून रस्ते बनविले आहेत. यापूर्वी बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीत दरोडे, चोऱ्यांच्या घटना घडल्या. चोर, दरोडेखोराकडून मारहाणीचे प्रकारही घडले. डिझेल चोरीच्या अनेक घटनांनी वाहनधारक विशेषत: ट्रकचालक हैराण झाले होते. काही कुटुंबियांना दरोड्याच्या घटनांना सामोरे जावे लागल्याने थोडा आराम करण्यासाठी थांबणे धोक्याचे झाले आहे. यामुळे पेट्रोल पंपाच्या ठिकाणीदेखील लोक रात्रीच्या वेळी थांबत नाहीत.
दोन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दरोडेखोरांनी भरदिवसा धुमाकूळ घालून लूटमार केल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर लोक प्रश्न उपस्थित करू लागले आहेत. परंतु बुलढाणा जिल्ह्यातून प्रवाशांचा सुखकर प्रवास व्हावा, याची दक्षता घेत पोलिस अधीक्षकांनी गस्ती पथके तैनात केली आहेत.
संकटात डायल करा ११२ क्रमांक
समृद्धी महामार्गावर संकटात सापडलेल्या वाहनधारकांना तातडीने मदत मिळावी, यासाठी ११२ क्रमांक डायल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हा नंबर डायल केल्यास समृद्धी महामार्गावर आपत्कालीन मदत या पथकांच्या माध्यमातून मिळणार आहे. अडचणीतील प्रवाशांसाठी हे पोलीस संकटमोचक ठरणार आहेत.
चोवीस तास ‘जागते रहो’
समृद्धी महामार्गावर महामार्ग पोलिसांचे स्वतंत्र पथक फिरत असते. आता त्या पथकाच्या सोबतीला चोवीस तास ही दोन विशेष पथके सेवा देणार आहेत. त्यासाठी अधिकाऱ्यांची ड्युटी बदलत गस्त घातली जाणार आहे. म्हणजेच चोवीस तास फिरता जागता पहारा दिला जाणार आहे.
गस्तीसाठी दोन उपविभागांची हद्द
मेहकर उपविभागात एक व देऊळगाव राजा उपविभागात एक वाहन, अशी दोन वाहने ८७ पैकी निम्म्या किलोमीटरवर गस्त घालतील. दोन्ही उपविभागात सहा पोलिसमधून एक अधिकारी व तीन कर्मचारी आठवड्यातून आलटून पालटून सेवा देतील.


