mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

जिजाऊ ज्ञान मंदिरमध्ये सैनिक रक्षाबंधन सोहळा : Soldiers Raksha Bandhan Celebration at Jijau Dnyan Mandir

शेअर करा :

Soldiers’ Raksha Bandhan Celebration at Jijau Dnyan Mandir : शौर्याचा धागा, अभिमानाची राखी, जिजाऊ ज्ञान मंदिरमध्ये सैनिक रक्षाबंधन सोहळा

Soldiers' Raksha Bandhan Celebration at Jijau Dnyan Mandir


बुलढाणा : जिल्ह्यातील सुंदरखेड येथील राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पळसखेड भट येथे नुकताच “धागा शौर्य का, राखी अभिमान की” हा हृदयस्पर्शी सैनिक रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमातून देशाच्या सीमेवर अहोरात्र जागणाऱ्या सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली, तसेच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधिलकीचे बीज रोवले गेले.

Soldiers' Raksha Bandhan Celebration at Jijau Dnyan Mandir
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा. संदीप दादा शेळके यांनी अध्यक्षस्थान भूषवले. प्रमुख अतिथी म्हणून माजी सैनिक  वासुदेव जाधव, सुभेदार  शेषराव नरवाडे, कर्नल शिवराम निकम यांच्यासह अनेक आजी-माजी सैनिक, त्रिदल सैनिक संघटनेचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. या उपस्थितीने कार्यक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली.

त्रिदल सैनिक संघटना राज्य उपाध्यक्ष जयसियाराम सोळंकी यांनी आपल्या मनोगतात भाऊसाहेब शेळके यांनी लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाल्याचे नमूद केले. शाळेतून विविध गुणसंपन्न विद्यार्थी घडत असून, काही विद्यार्थी सैन्यातही दाखल झाल्याचे पाहून त्यांना आनंद झाला. सैनिकी जीवनाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी, “तुफान मे, होली मे, देश के सन्मान में, अढीग कर्तव्य के विचल परिपाठी हुं, मै खाकी हुं…. मै खाकी हुं,” अशा शायराना अंदाजात सैनिकांच्या कर्तव्यनिष्ठेचे वर्णन केले. दरवर्षी शाळेकडून मिळणाऱ्या या प्रेमाच्या धाग्यामुळे शाळेबद्दलची आत्मीयता वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात संदीप दादा शेळके यांनी जिजाऊ ज्ञान मंदिरच्या प्रगतीचा आलेख मांडला. स्पोर्ट्स हब, शिक्षण हब, जिल्हा क्रीडा पुरस्कार, स्वच्छ विद्यालय पुरस्कार, विज्ञान प्रदर्शन आणि शिष्यवृत्ती यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांची सातत्याने प्रगती होत असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये सर्वांगीण गुणसंपन्नता यावी यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, असे ते म्हणाले. सैनिकांचा बहुमान करणे हे आपले कर्तव्य असून, त्यांचा त्याग, बलिदान आणि शौर्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. “आपण सीमेवर रक्षण करता, म्हणूनच आम्ही इकडे शांततेत जगू शकतो. आपला आदर्श घेऊन विद्यार्थी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. हाच आमचा बहुमान आहे,” असे सांगत त्यांनी सैनिकांप्रति आदर व्यक्त केला.

माजी सैनिक शेषराव नरवाडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले, तर माजी सैनिक एकनाथ सातव यांनी वृक्ष संवर्धनासाठी आवश्यक तेवढी झाडे देण्याचा मानस व्यक्त करून पर्यावरणाप्रती आपली बांधिलकी दर्शविली. यानंतर, शाळेतील विद्यार्थिनींनी उपस्थित सैनिक बांधवांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा केला. या दृश्याने उपस्थितांचे डोळे पाणावले. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या पर्यावरणपूरक राख्या आणि चित्रकला स्पर्धेतील कलाकृतींचे मान्यवरांनी निरीक्षण केले आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट यांनी केले, तर सूत्रसंचालन किरण जाधव यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. शेवटी, रुपाली गवते यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. “धागा शौर्य का, राखी अभिमान की” हा कार्यक्रम केवळ एक सोहळा नव्हता, तर तो राष्ट्रभक्ती, कृतज्ञता आणि सामाजिक एकोपा यांचा संगम होता, ज्याने जिजाऊ ज्ञान मंदिरच्या प्रांगणात एक अविस्मरणीय आठवण कोरली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top