Farmers in distress due to a fifty-day dry spell. : पन्नास दिवसांच्या पावसाच्या खंडामुळे शेतकरी संकटात: ॲड. जयश्री शेळके यांनी सरकारवर साधला निशाणा

बुलढाणा: महाराष्ट्रातील शेतकरी सध्या मोठ्या संकटातून जात आहेत. गेल्या ५० दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. या गंभीर परिस्थितीकडे सरकार गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्त्या ॲड. जयश्री शेळके यांनी केला आहे. जयस्तंभ चौकात दुष्काळी जीआरची होळी करून त्यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी केली.

सरकारच्या ‘काजू-बदाम’ बैठका आणि ‘दौऱ्यांची नौटंकी’
ॲड. शेळके यांनी सरकारवर टीका करताना म्हटले आहे की, “शेतकरी हवालदिल झालेला असताना सत्ताधाऱ्यांकडून आढावा बैठकींच्या नावाखाली काजू-बदाम खाण्याची राजेशाही व्यवस्था आणि त्यानंतर झालेली दौऱ्यांची नौटंकी यामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम झाले आहे.” शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदतीची गरज असताना सरकारने केवळ पंचनाम्यांचा जीआर काढून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप त्यांनी केला.

आर्थिक मदतीची तातडीने गरज
ॲड. शेळके यांनी स्पष्ट केले की, सरकारने दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंचनाम्यांचा जीआर काढला असला तरी, शेतकऱ्यांच्या हातात प्रत्यक्ष आर्थिक मदत कधी येणार, हा खरा प्रश्न आहे. पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा करायला लावण्याऐवजी सरकारने तातडीने ठोस आर्थिक मदत जाहीर करावी अशी त्यांची मागणी आहे. पावसाच्या खंडामुळे आणि पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये पीकनुकसान भरपाई तातडीने जाहीर करावी अशी मागणी त्यांनी केली.
“पंचनाम्यांचा कागद नुकसान भरून काढू शकत नाही”
ॲड. जयश्री शेळके यांनी सरकारवर हल्लाबोल करताना म्हटले की, “शेतकऱ्याने पिकासाठी पैसा खर्च केला, कर्ज काढले, दिवसरात्र कष्ट केले आणि ऐन हंगामात पावसाने दडी मारली. अशा वेळी सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे अपेक्षित आहे. मात्र, सरकार पंचनामे, बैठका आणि दौऱ्यांच्या नौटंकीत व्यस्त आहे. पंचनाम्यांचा कागद शेतकऱ्याचे नुकसान भरून काढू शकत नाही; शेतकऱ्याच्या खात्यात प्रत्यक्ष मदत जमा झाली पाहिजे.”
तीव्र आंदोलनाचा इशारा
ॲड. शेळके यांनी हेक्टरी ५० हजार रुपये मदत जाहीर करण्याची, पंचनाम्यांची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्यक्ष नुकसानभरपाई जमा करण्याची मागणी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारने आणखी दुर्लक्ष केल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अधिक तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही त्यांनी दिला.
दुष्काळी जीआरची होळी
दरम्यान, सरकारच्या पंचनाम्यांच्या जीआरचा आणि शेतकऱ्यांप्रती सरकारच्या उदासीन भूमिकेचा निषेध म्हणून जयस्तंभ चौक, बुलढाणा येथे जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत आणि ॲड. जयश्री शेळके यांच्या नेतृत्वाखाली पंचनाम्यांच्या जीआरची प्रत जाळण्यात आली. शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत जीआरची होळी करून सरकारच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. “पंचनाम्यांची नौटंकी नको, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत द्या; हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई जाहीर करा!” अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


