Appeal to promptly submit consent forms for drought relief grants in the Sindkhed Raja subdivision : सिंदखेड राजा उपविभागात दुष्काळ अनुदानासाठी संमतीपत्रे तातडीने जमा करण्याचे आवाहन; प्रशासकीय आढावा बैठक संपन्न

अमोल साळवे
प्रतिनिधी दि १९ : सिंदखेड राजा येथील उपविभागीय कार्यालयात गुरुवारी१९ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रशासकीय कामकाज, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आणि शासकीय कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत दुष्काळ अग्रिम अनुदान, शेतकरी नोंदणी मोहीम, विहीर खोदकाम परवानगी तसेच पाणीटंचाई यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीत प्रामुख्याने दुष्काळ अग्रिम अनुदानांतर्गत पाच हजार रुपये मिळण्यासाठी पात्र असलेल्या परंतु अद्याप संमतीपत्रे सादर न केलेल्या सामूहिक खातेदार शेतकऱ्यांकडे विशेष लक्ष वेधण्यात आले. अशा सर्व शेतकऱ्यांनी आवश्यक संमतीपत्रे तातडीने भरून संबंधित ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडे जमा करावीत, असे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच शेतकरी डिजिटल ओळख नोंदणी मोहिमेअंतर्गत ज्यांची नोंदणी अद्याप अपूर्ण आहे, त्यांनी नजीकच्या अधिकृत सुविधा केंद्रावर जाऊन ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करून घ्यावी, असे निर्देशही देण्यात आले.
शेतकऱ्यांच्या सिंचनविषयक गरजा लक्षात घेता, नवीन विहीर खोदकाम परवानगीसाठी इच्छुक असणाऱ्यांनी संबंधित महसूल कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्राप्त होणाऱ्या अर्जांवर तातडीने अहवाल मागवून ते पुढील कार्यवाहीसाठी तात्काळ उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे पाठवावेत, असे सक्त निर्देश प्रा. संजय खडसे यांनी उपस्थित तहसीलदारांना दिले.
महसूल विभागाची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी स्थानिक स्तरावरील प्रश्न प्राधान्याने सोडविण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. कोणतेही शासकीय काम विनाकारण प्रलंबित राहू नये, सर्वसामान्य नागरिकांना कल्याणकारी योजनांचा लाभ वेळेत मिळावा आणि प्रशासनातील सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, यावर भर देण्यात आला. शेतकरी व नागरिकांना शासकीय सुविधा सुलभतेने उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिकता असून सर्व यंत्रणांनी कालमर्यादेत जबाबदारी पार पाडावी, असे
या बैठकीस सिंदखेड राजाचे प्रभारी तहसीलदार प्रविण वऱ्हाडे, देऊळगाव राजाचे तहसीलदार प्रमोद खामाट, सिंदखेड राजाचे तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते, देऊळगाव राजाचे तालुका कृषी अधिकारी भगवान कछवे यांच्यासह उपविभागातील सर्व मंडळ अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


