mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

गोठ्यातील अवैध गर्भलिंग निदानाचा पर्दाफाश : Illegal fetal sex determination in a cattle shed exposed

शेअर करा :

Illegal fetal sex determination in a cattle shed exposed : गोठ्यातील अवैध गर्भलिंग निदानाचा पर्दाफाश ! पीसीपीएनडीटीच्या जाळ्यात तिघे अडकले; पोर्टेबल सोनोग्राफी मशीन जप्त

Illegal fetal sex determination in a cattle shed exposed


 तीनही आरोपी अटक ; अमडापूर–लवाळा रोडवरील प्रकाराने जिल्ह्यात खळबळ

 

बुलढाणा, दि. २१ : मुलगा की मुलगी हे जाणून घेण्याच्या हव्यासातून सुरू असलेल्या अवैध गर्भलिंग निदानाच्या धंद्याचा बुलढाणा जिल्ह्यात मोठा पर्दाफाश झाला आहे. कोणत्याही अधिकृत रुग्णालयात नव्हे, तर अमडापूर–लवाळा रोडवरील एका शेतातील पत्र्याच्या गोठ्यात पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या माध्यमातून हा कथित गोरखधंदा सुरू असल्याचे पीसीपीएनडीटी विभागाच्या संयुक्त पथकाच्या कारवाईत उघड झाले. अकोला, वाशिम आणि बुलढाणा येथील पथकाने नियोजनबद्ध सापळा रचत तिघांना रंगेहात पकडले. घटनास्थळावरून सोनोग्राफी मशीन व तपासणीचे साहित्य जप्त करण्यात आले असून, तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

आठ तासांचा पाठलाग अन् अखेर गोठ्यात धाड!

संबंधित संशयित पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या साहाय्याने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अवैध गर्भलिंग निदान करत असल्याची गोपनीय माहिती पीसीपीएनडीटी विभागाला मिळाली होती. या माहितीची गंभीर दखल घेत उपसंचालक डॉ. आरती कुलवाल यांच्या मार्गदर्शनाखाली डिकॉय (Decoy) कारवाईचे नियोजन करण्यात आले.

२१ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजल्यापासून पथक संशयितांच्या मागावर होते. संशयितांचा माग काढत पथक अमडापूर–लवाळा रोडवरील गणेश शंकरराव सूर्यवंशी यांच्या शेतापर्यंत पोहोचले. शेतातील पत्र्याच्या गोठ्यात डिकॉय प्रकरणाच्या माध्यमातून सोनोग्राफी तपासणी सुरू होताच दबा धरून असलेल्या पथकाने अचानक धडक दिली. दुपारी दोन वाजताच्या सुमारास ही कारवाई यशस्वी झाली आणि बोगस डॉक्टरसह तिघांना ताब्यात घेण्यात आले.

आरोपींकडून पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आणि तपासणीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी सायंकाळी सहा वाजता अमडापूर पोलीस स्टेशनमध्ये गणेश शंकरराव सूर्यवंशी व श्रेयस गणेश सूर्यवंशी रा. अमडापूर राहुल नामदेव इंगळे रा. वाशिम या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ. उमर सय्यद, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय चिखली यांनी फिर्याद दिली.

तीन जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त मोहीम

ही कारवाई डॉ. आरती कुलवाल, उपसंचालक, अकोला मंडळ; डॉ. दत्तात्रय बिराजदार, जिल्हा शल्यचिकित्सक, बुलढाणा; तसेच डॉ. अनिल कावरखे, जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या मोहिमेत डॉ. उमर सय्यद, डॉ. अनुप चौधरी, डॉ. सोनाली तायडे, ॲड. शुभांगी ठाकरे, किरण जाणूनकर, डॉ. राहुल डोंगरे, ॲड. राधा नरवलिया, ॲड. वंदना काकडे, डॉ. उमेश सावजी आणि ज्ञानेश्वर मुळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

वाशिम एलसीबीचे पोलीस कर्मचारी पीसी संतोष वाघ, एलपीसी तेजस्विनी खोडके आणि डीपीसी सुनील तायडे यांनीही या कारवाईला विशेष सहकार्य केले. अमडापूर पोलिसांचेही सहकार्य लाभले.

मुलींच्या जन्मावर घाला घालणाऱ्या प्रवृत्तींना चाप बसणार?

गर्भलिंग निदान करणे, गर्भलिंग सांगणे अथवा अशा बेकायदेशीर कृत्यांना मदत करणे हा पीसीपीएनडीटी कायद्यानुसार दंडनीय अपराध आहे. स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी आणि समाजात मुलगा-मुलगी समानतेची भावना रुजवण्यासाठी प्रशासनाकडून अशा गैरप्रकारांविरुद्ध कठोर कारवाई केली जात आहे.

शेतातील गोठ्यासारख्या ठिकाणी पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या माध्यमातून सुरू असलेल्या कथित अवैध प्रकाराचा पर्दाफाश झाल्याने अशा गैरप्रकारांचे जाळे किती खोलवर पसरले आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या कारवाईमुळे अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top