Discovery of the Buddhist Stupa of Bhon; Prof. Dr. Devatare felicitated : भोन या गावामध्ये २३०० वर्षांपूर्वी सम्राट अशोक यांनी निर्माण केलेल्या शहरांचे व प्राचीन बौद्ध स्तुपाचे उत्खनन करून जिल्ह्याला जागतिक ओळख निर्माण करून देणारे पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती आणि पुरातत्व विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. बी.सी. देवतारे यांचा ६ फेब्रुवारीला सायंकाळी सहा वाजता बुलढाणा येथील गोवर्धन सभागृहात नागरी सत्कार करण्यात येणार आहे.

६ फेब्रुवारीला बुलढाण्यात आयोजन : सम्राट अशोकांनी निर्माण केलेले स्तूप
बुलढाणा : जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात पूर्णा नदीच्या काठावर वसलेल्या भोन या गावामध्ये २३०० वर्षांपूर्वी सम्राट अशोक यांनी निर्माण केलेल्या शहरांचे व प्राचीन बौद्ध स्तुपाचे उत्खनन करून जिल्ह्याला जागतिक ओळख निर्माण करून देणारे पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती आणि पुरातत्व विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. बी.सी. देवतारे यांचा ६ फेब्रुवारीला सायंकाळी सहा वाजता बुलढाणा येथील गोवर्धन सभागृहात नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीच्या औचित्यावर जाहीर सत्कार आणि व्याख्यानाचे आयोजन केले आहे. प्रा.देवतारे यांनी २००३ ते २००७ पर्यंत पूर्णा नदीच्या काठावर असलेल्या प्राचीन भोन गावाचे उत्खनन केले. हे गाव एका काळी संपन्न शहर होते. दक्षिण व उत्तर जंबोद्वीपाला जोडणारी ही बाजारपेठ होती, हे स्पष्ट केले. मौर्य काळामध्ये सम्राट अशोकांनी या शहराचा विकास करून येथे बौद्ध स्तूपाची निर्मिती केली होती. बुलढाणा हा ऐतिहासिक व प्राचीन वारसा लाभलेला जिल्हा आहे. हे या उत्खननातून आणि संशोधनातून सिद्ध झाले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन निवृत्त अप्पर जिल्हाधिकारी रमेश घेवंदे हे करणार आहेत. लेखक व विचारवंत प्रा. रवींद्र इंगळे चावरेकर, नागपूर विद्यापीठाचे पुरातत्व विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे, इतिहास संशोधक प्रा. डॉ. श्याम देवकर, व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, दिशा अर्बनच्या अध्यक्षा ॲड. जयश्रीताई शेळके, वकील संघाचे जिल्हाध्यक्ष विजय सावळे, मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जैन, लेखिका प्रा. डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे, आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश्वर उबरहंडे, जामा मस्जिदचे इमाम हाफिज रहमत खान व सामाजिक कार्यकर्त्या शाहीना पठाण यांची उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त उपासिका संघ व दि बुद्धिस्ट ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आयोजक कुणाल पैठणकर, प्रा. राजेश खंडेराव, ॲड. राहुल दाभाडे, सुरेश डवरे, आत्माराम चौतमोल, भिकाजी मेढे, मोनिका साळवे, प्रशांत बोर्डे, संजय जाधव, सुरेश घेवंदे, सुरेश सरकटे,प्रा. प्रदीप जाधव, सारिका घेवंदे, सिद्धार्थ आराख, गणेश झोटे, पद्माकर डोंगरे, प्रल्हाद कांबळे यांनी केले आहे.
बंगळुरुच्या संस्थेने अहवाल केला प्रकाशित
भोनच्या उत्खननाचा अहवाल बंगळुरु येथील एका प्रसिद्ध संस्थेने प्रकाशित केला असून, तो सार्वजनिक झाला आहे. ही बाब बुलढाणा जिल्हावासियांसाठी अभिमानाची आणि गौरवान्वित करणारी आहे. देवतारे यांनी केलेल्या कामाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बुलढाणा जिल्हावासियांच्या वतीने नागरी सत्कार व भारतीय पुरातत्व विभागाचे जनक मेजर जनरल सर अलेक्झांडर कलिंगम या नावाने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
पुस्तकांचे प्रकाशन
स्तुपावर सखोल चर्चा होऊन तो अहवाल जनसामान्यांपर्यंत पोहोचावा, याकरिता भारतातील प्रसिद्ध इतिहासकार विचारवंत लेखक प्रा.डॉ. विलास खरात यांचे जाहीर व्याख्यान व त्यांनी लिहिलेल्या दोन पुस्तकांचे प्रकाशन या कार्यक्रमात होणार आहे.

