mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

अपात्र लाडक्या बहिणींना ई-केवायसीची नव्याने संधी : A new opportunity for e-KYC for beloved sisters

शेअर करा :

A new opportunity for e-KYC for beloved sisters : अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा शासनाने ई-केवायसी करण्याची नव्याने संधी देण्याचा दिलासादायक निर्णय घेतला आहे. त्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२६ ठेवण्यात आली आहे.

A new opportunity for e-KYC for beloved sisters

चुकीचा पर्याय निवडून अपात्र ठरलेल्या महिलांना सरकारचा दिलासा

शरद माळोदे
बुलढाणा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिला ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्या गेल्याने अपात्र ठरल्या. दीड हजारांचा लाभ बंद झाल्याने लाडक्या बहिणींमध्ये उफाळून आलेला रोष पाहता राज्य शासनाने पुन्हा एकदा ई-केवायसी करण्याची संधी महिलांना उपलब्ध करून दिली आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत या महिलांना ई-केवायसी करता येणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील अपात्र ठरलेल्या ५४ हजार ९९१ लाडक्या बहिणींसह राज्यभरातील ई-केवायसी चुकलेल्या महिलांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना शासनाने ई-केवायसी बंधनकारक केली आहे. ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम मुदत होती. अखेरची तारीख जसजशी जवळ येत होती, तसे ई-केवायसी प्रक्रियेसाठी महिलांची धावपळ उडाली होती. ही प्रक्रिया पूर्ण करताना बहुतांश महिलांनी चुकीचा पर्याय निवडला. त्यामुळे त्या महिला अपात्र ठरून दीड हजारांच्या लाभाला मुकल्या.
‘लाभार्थ्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे किंवा कसे’ असे प्रश्न ई-केवायसी करताना विचारण्यात आले होते. त्याची उत्तरे देताना महिलांकडून गफलत झाली आणि चुकीचे पर्याय निवडल्या गेले. घरातील सदस्य नोकरीत असल्याचे ग्राह्य धरून महिलांना अपात्र ठरविण्यात आले.
दर महिन्याला मिळणारे दीड हजार रुपये बॅंकखात्यात जमा होणे बंद झाल्याने महिलांमध्ये ओरड सुरू झाली. महिलांनी तालुकास्तरावरील एकात्मिक बाल विकास कार्यालय तसेच जिल्हा स्तरावरील जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयात चकरा मारणे सुरू केले. कार्यालयांमध्ये गोंधळ सुरू केला. जिल्हाधिकारी कार्यालयावरदेखील खामगाव तालुक्यातील महिलांनी मोर्चा काढून रोष व्यक्त केला होता.

लाडक्या बहिणी आक्रमक होत असल्याचे पाहून योजनेतील निकषाच्या अनुषंगाने लाभार्थी महिलांची सखोल तपासणी करून पात्र-अपात्र ठरविण्याचे आदेश शासनाने दिले होते. अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष पडताळणी करण्याबाबत शासनाने आदेश दिले होते. तसेच पडताळणीविषयी महिलांच्या नावांच्या याद्याही पाठविण्यात आल्या होत्या.
लाभार्थ्यांची जलदगतीने पडताळणी करण्याकरिता ऑनलाईन ई-केवायसीमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी देण्यात यावी, अशी मागणी लाभार्थी महिलांसह क्षेत्रिय कार्यालयांकडून शासनाकडे करण्यात येत होती. अखेर त्या मागणीचा गांभीर्यपूर्वक विचार करून शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने ऑनलाइन ई-केवायसीमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. यासंदर्भातील परिपत्रक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी जारी करण्यात आले.

पर्याय चुकलेल्या महिलांनाच ३१ मार्चपर्यंत संधी
ज्या महिलांचा ई-केवायसी करताना नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडला गेला, अशा महिलांसाठीच ऑनलाइन ई-केवायसीमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी ३१ मार्च २०२६ पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पोर्टलमध्ये केली सुधारणा

ई-केवायसी करण्यासाठी योजनेच्या पोर्टलवर सुधारणा करण्यात आली आहे. यापुढे कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार नाही, अशी ताकीदही देण्यात आली आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top