A tribal gathering in the Satpura mountains: वर्षानुवर्षे चालत आलेल्या इंदल पूजेचा सोहळा जळगाव जामोद तालुक्यातील निमखेडी या आदिवासी गावात उत्साहात पार पडला. विदर्भासह मध्य प्रदेशातून हजारो आदिवासीबांधव कुटुंबीयांसह सहभागी झाले. निसर्गाला वाहून घेतलेल्या आदिवासींनी झाडांची पूजा करून सुख-समृद्धीचे मागणे मागितले.

बुलढाणा : वर्षानुवर्षे चालत आलेल्या इंदल पूजेचा सोहळा जळगाव जामोद तालुक्यातील निमखेडी या आदिवासी गावात उत्साहात पार पडला. विदर्भासह मध्य प्रदेशातून हजारो आदिवासीबांधव कुटुंबीयांसह सहभागी झाले. निसर्गाला वाहून घेतलेल्या आदिवासींनी झाडांची पूजा करून सुख-समृद्धीचे मागणे मागितले.
इंदल पूजा म्हणजे या लोकांसाठी एकप्रकारे दिवाळीचा सणच असते. समाजातील एखाद्या कुटुंबाला इंदल पूजा करावयाची झाल्यास ते दिवाळी याचवेळी साजरी करतात, अशी प्रथा आहे. शेकडो वर्षांपासून ही परंपरा चालत आल्याचे वृद्ध आदिवासी सांगतात. जळगाव जामोद तालुक्यातील निमखेडी या गावात इंदल पूजेचा उत्सव साजरा केला जातो. इंदल म्हणजे इंदीराजा. त्याला आदिवासी लोक लोकदेवता मानतात. या उत्सवात झाडांची पूजा केली जाते. काही निवडक लोकांनी गावाबाहेरून कळम (कदंब) झाडाच्या फांद्या तोडून आणण्यानंतर पूजा मांडण्यात आली. जळगाव जामोद ते बुऱ्हाणपूर राज्य महामार्गाच्या निमखेडी फाटा येथे इंदलची महापूजा करण्यात आली.
जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यासह जळगाव खान्देश आणि मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर, बडवानी, खकनार या भागातून २५ हजारांवर आदिवासीबांधव इंदल पूजा उत्सवात सहभागी झाले होते.
ज्या कुटुंबाला इंदल पूजा आयोजित करावयाची असते, त्यांना ५, ७, ९ किंवा ११ वर्षांनी उत्सव साजरा करावा लागतो, हे या पूजेचे खास वैशिष्ट्य आहे.

सस्त्या परिवाराला मान
यावर्षी निमखेडीच्या रिंगणसिंग परिवारातील सस्त्या या कुटुंबाने इंदल पूजेचा मान मिळविला. या कुटुंबातील सदस्यांनी सर्व नियोजन केले. पटेल उदयसिंग ससत्या यांच्या अधिपत्याखाली दिवाळीचा सण साजरा करण्यात आला.
पहाडात गुंजला वाद्याचा गजर
५० ढोल, ताशे, मांदल बासरीचा निनाद सातपुड्याच्या पहाडात गुंजला. महिला, पुरुष, मुले आपल्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले. आदिवासी गाणी आणि नृत्यांत सर्वजण दंग झाल्याचे पाहायला मिळाले.

