Appeal to rectify the errors in the Swadhar Yojana application : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना” अंतर्गत शैक्षणिक सत्र २०२५ -२६ साठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी अर्जातील त्रुटींची तात्काळ पूर्तता करावी,

बुलढाणा : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना” अंतर्गत शैक्षणिक सत्र २०२५ -२६ साठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी अर्जातील त्रुटींची तात्काळ पूर्तता करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, बुलढाणा कार्यालयाने केले आहे.
शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या, तसेच रीतसर अर्ज करूनही प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील इयत्ता ११ वी, १२ वी आणि १२ वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विविध स्तरांवरील महाविद्यालये/शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधांसाठी आवश्यक आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना शासन निर्णय दि. ०६ जानेवारी २०१७ अन्वये सुरू करण्यात आली आहे.
योजनेचा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा आणि कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, या उद्देशाने योजनेचा विस्तार तालुकास्तरावर दि. २६ डिसेंबर २०२४ च्या शासन निर्णयान्वये करण्यात आला आहे.
सदर योजनेसाठी विद्यार्थ्यांनी http://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर केले असून अर्जांची कार्यालयीन तपासणी सुरू आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःचा आयडी व पासवर्ड वापरून अर्जाची सद्यस्थिती वेळोवेळी तपासावी.
ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज “Send Back” करण्यात आले आहेत त्यांनी अर्जातील नमूद त्रुटी विहित वेळेत दुरुस्त करून अर्ज पुन्हा ऑनलाईन पद्धतीने फॉरवर्ड करावा. अर्ज फॉरवर्ड करण्यापूर्वी बँक तपशील — खाते क्रमांक, IFSC कोड, खातेधारकाचे नाव इत्यादी माहिती अचूक नोंदविण्याचे विशेष निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून लाभाची रक्कम आधार-संलग्न बँक खात्यात थेट व वेळेत जमा होईल.
तसेच शैक्षणिक सत्र२०२५ -२६ मध्ये ऑनलाईन अर्ज केलेल्या, परंतु अर्जाची हार्डकॉपी व आवश्यक कागदपत्रे अद्याप कार्यालयात जमा न केलेल्या विद्यार्थ्यांनी दि. १८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत संबंधित कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, बुलढाणा मनोज मेरत यांनी केले आहे.

