apply now for schools located more than one kilometer away : आरटीईच्या २५ टक्के प्रवेशासाठीची अट न्यायालयाने रद्द केल्याने पालकांना दिलासा मिळाला आहे. आता एक किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या शाळेत नव्याने अर्ज करून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करणे सोपे झाले आहे.

एक किलोमीटरची अट न्यायालयाने केली रद्द : अर्जास २५ मार्चपर्यंत मुदतवाढ
बुलढाणा : आपल्या पाल्यांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळून शिक्षण घेता यावे, असे स्वप्न उराशी बाळगून आर्थिक दुर्बल घटकातील पालकांनी आरटीईच्या २५ टक्के प्रवेशासाठी अर्ज भरले. परंतु शासनाच्या शिक्षण विभागाकडून एक किलोमीटरची अट लादण्यात आली. हे प्रकरण न्यायालयात दाखल झाल्यानंतर न्यायालयाने पाल्यांचे हित लक्षात घेत ही अट रद्द केली. आता पालक आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी तातडीने एक किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या शाळेसाठी अर्ज करू शकणार आहेत. २५ मार्चपर्यंत अर्ज करता येणार असल्याने पालकांनी तत्काळ अर्ज करावेत, असे आवाहन शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी केले आहे.
आरटीईच्या २५ टक्के प्रवेशासाठी जर एक किलोमीटर अंतरावर शाळा उपलब्ध नसेल तर मुलांना त्यापेक्षा जास्त अंतरावरील शाळेमध्ये प्रवेश घेण्यापासून रोखता येणार नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल याचिकेवर न्यायालयाने नोंदविले. त्यानुसार आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी अर्ज भरण्यासाठी असलेली एक किलोमीटरची अट रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे ज्या पालकांनी एक किलोमीटरच्या आत असलेल्या शाळांची निवड करून अर्ज भरलेला आहे व ज्या पालकांनी सदर प्रवेशासाठी नोंदणी केली आहे त्यांना आता एक किलोमीटर, एक ते तीन किलोमीटर तसेच तीन किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरील शाळासुद्धा उपलब्ध झाल्या आहेत.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) सी नुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील मुलांसाठी खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के मोफत शिक्षणाची तरतूद आहे. त्यानुसार प्राथमिक शिक्षण संचालकांच्या १५ फेब्रुवारी २०२६ च्या पत्रानुसार आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी एक किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरील शाळा निवडण्याचे स्वातंत्र्य पालकांना देण्यात आलेले होते. तथापि न्यायालयाच्या निर्णयानंतर ही अट आता वगळण्यात आली आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने सर्व संबंधितांना आरटीई पोर्टलवर आपला आरटीई २५ टक्केचा अर्ज अनकन्फर्म करून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ज्या पालकांना आपला यापूर्वी भरलेला अर्ज अनकन्फर्म करायचा असेल त्यांनी आपल्या तालुक्याचे गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे तत्काळ संपर्क करावा, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी केले आहे.
संबंधित पालकांनी याबाबत आरटीई २५ टक्के पोर्टलवरून आवश्यक ती माहिती भरून सुधारित अर्ज त्यांना करता येईल. त्याचप्रमाणे आरटीई २५ टक्के प्रवेशासाठीचे अर्ज भरण्यास २५ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विकास पाटील यांनी सांगितले.
तरी बुलढाणा जिल्ह्यातील सदर प्रवेशासाठी पात्र असणाऱ्या पालकांनी आपल्या तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांचे कडे तात्काळ आजच संपर्क करावा व विहित मुदतीत आपला अर्ज ऑनलाईन सादर करावा असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी केले आहे.


