Arousing devotion on the day of revelation : संत गजानन महाराजांचा प्रगटदिन उत्सव रविवारी लाखो भाविकांच्या साक्षीने भक्तिमय वातावरणात पार पडला. श्रींच्या प्रगट स्थळासह मंदिरातील समाधीचे दर्शन घेण्यासाठी रात्रभरापासून रांगा लागल्या होत्या. १४८व्या प्रकट दिन सोहळ्याला राज्यभरातून तीन लाखांवर भाविक आले होते.

श्रीचरणी लाखो भाविक लीन
बुलढाणा : संत गजानन महाराजांचा प्रगटदिन उत्सव रविवारी लाखो भाविकांच्या साक्षीने भक्तिमय वातावरणात पार पडला. श्रींच्या प्रगट स्थळासह मंदिरातील समाधीचे दर्शन घेण्यासाठी रात्रभरापासून रांगा लागल्या होत्या. १४८व्या प्रकट दिन सोहळ्याला राज्यभरातून तीन लाखांवर भाविक आले होते. शनिवार व रविवार असे दोन्ही दिवस भाविकांसाठी मंदिराची द्वारे खुली होती. भाविकांच्या जमलेल्या गर्दीने जणू भक्तीसागरच उसळला होता.
‘गण गण गणात बोते, जय गजानन श्री गजानन, ज्ञानोबा तुकाराम’ आणि टाळ, मृदंगाच्या निनादात दिंड्या संतनगरीत दाखल झाल्या होत्या. ज्या ठिकाणी गजानन महाराज प्रगटले, त्या स्थळावर भाविक रात्रभरापासून रांगा लावून दर्शन घेत होते. तसेच मंदिरातील गजानन महाराजांच्या समाधी स्थळी नतमस्तक होण्यासाठी देखील दर्शन बारीमध्ये भाविक शांतेतेने पुढे सरकत होते. आलेल्या प्रत्येक भाविकाला दर्शन घेण्यासाठी श्रींचे मंदिर ७ व ८ फेब्रुवारीला रात्रभर खुले ठेवण्यात आले होते.
गजानन महाराज संस्थानच्या वतीने प्रगटदिन उत्सवानिमित्त २ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. या उत्सवात दरारोज सकाळी काकडा, गाथा भजन, दुपारी प्रवचन, सायंकाळी हरिपाठ व रात्री श्रीहरी कीर्तन झाले.
यागाची पूर्णाहुती; सायंकाळी पालखी मिरवणूक
प्रगटदिनी मंदिरात महारूद्र स्वाहाकार यागाची सकाळी १० वाजता पुर्णाहूती झाली. तसेच ‘श्रींच्या प्रागट्टया’ निमित्त श्रीहरी कीर्तन झाले. सायंकाळी शहरातून राजवैभवी थाटात पालखी मिरवणूक निघाली. पालखीमध्ये श्रींचा मुखवटा ठेऊन पालखी सोहळा सुरू झाल्याने भाविकांमध्ये भक्तीचे उधाण आले.
१०२९ भजनी दिंड्या
प्रगटदिन उत्सवामध्ये १०२९ दिंड्यांनी सहभाग घेतला. नियमांची पूर्तता केलेल्या एकूण ८८ नवीन दिंड्यांना १० टाळ, १ विणा, १ मृदंग, श्री ज्ञानेश्वरी, श्री तुकाराम गाथा, श्री एकनाथी भागवत असे संत साहित्य आणि श्री माऊली पताका वितरित करण्यात आल्या. जुन्या दिंड्यांना भजनी साहित्य दुरूस्तीसाठी नियमाप्रमाणे सानुग्रह अंशदान व इतर व्यवस्थेकरिता सहयोग देण्यात आला. तसेच उत्सवानिमित्त आलेल्या भजनी दिंड्यांमधील वारकऱ्यांची भोजन प्रसादाची व्यवस्था तसेच प्रथमोपचार केंद्राची सुविधा विसावा संकुल येथे करण्यात आली.
अडीच लाख भाविकांना महाप्रसाद
उत्सव काळात शेगावसह पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर, पंपासरोवर, ओंकारेश्वर, गिरडा अशा सर्व शाखांवर श्रींचा प्रगटदिन उत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला. या सर्व भक्ती स्थळांवर २ लाख ३४ हजार २४० भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले, अशी माहिती संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने देण्यात आली.







