
बायोफार्मा शक्तीसारख्या सुधारणा आरोग्य सेवेला सक्षम करणार
– केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव
बुलढाणा : यंदाचा अर्थसंकल्प हा विकसित भारताच्या संकल्पनेचा मार्ग सुकर करणारा तसेच आयुष आणि आधुनिक औषधांचा संगम असून हा भारतातील आरोग्य सेवा अधिक मजबुत करण्यासाठी आणि १० हजार कोटी किमंतीचा बायोफार्मा शक्तीसारख्या सुधारणा या आरोग्य सेवेला सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत, अशी प्रतिक्रिया केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केली आहे.
हा अर्थसंकल्प शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, उद्योजक, महिला विद्यार्थी आणि तरुणांना विकासाच्या संधी उपलब्ध करुन देणारा आणि सर्वसामान्य व्यक्तीला दिलासा देणारा सोबतच देशाला आर्थिक महासत्तेच्या वाटेवर नेणारा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दिल्ली येथे अर्थसंकल्पीय अधिवेशनात १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. उत्तम आरोग्य आणि समृध्द राष्ट्र निर्माण करण्यासाठी २०२६ च्या अर्थसंकल्पामध्ये आयुष आणि आरोग्य सेवेला प्राधान्य दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सितारामण यांचे केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आभार व्यक्त केले आहे. २०२६-२७ च्या अर्थसंकल्पामध्ये आयुर्वेद क्षेत्रात उच्च गुणवत्तेचे शिक्षण आणि संशोधन करण्यासाठी तीन नवीन अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. आयुष फार्मसी आणि औषध चाचणी प्रयोगशाळांना सुधारण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. पारंपरिक औषधांसाठी गुणवत्तापूर्वक संस्थांना अधिक सक्षम करण्यात येणार आहे. पारंपरिक आयुर्वेदिक औषध निर्मितीसाठी संशोधन कार्याला गती देण्यात येणार आहे. जामनगर येथील डब्ल्यूएचओ जागतिक पारंपारीक औषध केंद्राची श्रेणी सुधारण्याचाही प्रस्ताव अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे. नवीन पाच प्रादेशिक वैद्यकीय मुल्य पर्यटन केंद्रामध्ये आयुष केंद्रे स्थापन करण्यात येणार आहे.
“बायोफार्मा शक्ती” योजना भारताला जागतिक जैवफार्मा उत्पादन हब बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पुढील पाच वर्षांसाठी १० हजार कोटी रुपयांचा निधी आरोग्य व बायोफार्मा क्षेत्रासाठी राखून ठेवण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत बायोलॉजिक्स व बायोसिमीलर्स उत्पादन सक्षम करण्यात येणार आहे. बायोफार्मा आधारित औषध संशोधन व निर्मिती क्षमता वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून या योजनेमुळे देशांतर्गत विकासाला प्रोत्साहन मिळणार आहे. नवीन राष्ट्रीयकृत फार्मास्युटीकल एज्युकेशन रिसर्च संस्थाची (nipers) स्थापना करण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात ठेवण्यात आला आहे. त्यामुळे विद्यमान संस्थांमध्ये प्रगती होवून संशोधन कौशल्य विकास वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे आरोग्य संशोधन,तंत्रज्ञान औषध विकासातील भारतातील जाळे सशक्त होणार आहे. भारतात १ हजार मान्यताप्राप्त क्लिनिक ट्रायल साईट संस्था निर्माण करण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नवीन औषध निर्मिती विकास प्रक्रिया जलद होवून गुणवत्तापुर्वक आरोग्य सेवा मिळण्यास मदत होणार आहे. डायबिटीस, कर्करोग व ॲटो-इम्युन रोगांच्या रुग्णसंखेत वाढ होत असल्याने बायोफार्मा औषधांची गरज भविष्यात पडणार आहे. बायोफार्मा शक्ती या योजनेअंतर्गत रुग्णांसाठी उच्च दर्जाची औषधे निर्माण करुन ती औषधे सर्वसामान्यांना परवडणारी करण्यावर भर देण्यात आला आहे. प्रत्येक जिल्हा रुग्णालयामध्ये आपातकालीन व ट्रामा केअर केंद्राची स्थापना करुन ५० टक्के क्षमता वाढविण्याचे उद्दिष्ट या अर्थसंकल्पात ठेवण्यात आले आहे.
आयुष सेवा आंतरराष्ट्रीय आरोग्य वेलनेस हबचा प्रस्ताव
या अर्थसंकल्पात आयुर्वेद, योगा आणि पारंपरिक उपचार प्रणालीला महत्वाचे स्थान दिल्या गेले आहे. नवीन आयुष केंद्रे आणि शिक्षण संशोधन संस्था वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. आयुर्वेद, योगा आणि इतर आयुष सेवा आंतरराष्ट्रीय आरोग्य वेलनेस हब म्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव या अर्थसंकल्पात ठेवण्यात आला आहे त्यामुळे आरोग्य आणि वेलनेस पर्यटनसाठी नवीन संधी निर्माण होणार आहे.
ना. जाधवांनी मानले आभार
उत्तम आरोग्य आणि समृध्द राष्ट्र निर्माण करण्यासाठी २०३६ च्या अर्थसंकल्पामध्ये आयुष आणि आरोग्य सेवेला प्राधान्य दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे आभार मानून केंद्रीय आयुष, आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.

