Death toll in Ape-Car accident rises to two : सरस्वती ते मातमळ मार्गावर सुसाट वेगातील स्विफ्ट डिझायर कारने प्रवासी ॲपेला धडक दिल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महिलांची संख्या दोन झाली आहे.


लोणार : सरस्वती ते मातमळ मार्गावर सुसाट वेगातील स्विफ्ट डिझायर कारने प्रवासी ॲपेला धडक दिल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महिलांची संख्या दोन झाली आहे. एक महिला घटनास्थळीच दगावल्यानंतर जखमींपैकी आणखी एका महिलेची मेहकर येथे रुग्णालयात उपचार घेताना प्राणज्योत मालवली.
जरीनाबी आयुब शाह या शेतमजूर महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. तर गंभीर जखमींना मेहकर येथे हलविण्यात आले होते. यातील रंजना परमेश्वर कासतोडे (वय ५३) यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
सरस्वती येथे एमएच २० आर २२११ क्रमांकाच्या ॲपेमधून महिला शेतात कामासाठी निघाल्या होत्या. १ फेब्रुवारी २०२६ सकाळी ८.३० वाजता दरम्यान सरस्वती–मातमळ गावाला जोडणाऱ्या जोड रस्त्यावर हिवराखंडकडे जाणाऱ्या एमएच ४३ एएफ ५८२१ क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायरने ॲपेला जोरात उडविले. यात ॲपेचे अक्षरशः तुकडे झाले. १३ ते १४ महिला प्रवास करीत होत्या. त्यातील दोघींचा मृत्यू झाला. तर आणखी तीन महिलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांची नावे मात्र समजू शकली नाही.
चालकासह जखमी महिलांची नावे
चालक अतिक निसार शाह,
कल्पना विठ्ठल दमदाडे, अलका मधुकर शेवाळे, राधाबाई गजू गायकवाड, लक्ष्मी बबन करवंदे, शांताबाई परशराम शेळके, चंद्रभागाबाई जगन नागरे (सर्व रा. किनगाव जट्टू).
किनगाव जट्टूवर शोककळा
भीषण अपघातामध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला असून अन्य महिला गंभीर जखमी आहेत. या दुर्घटनेमुळे किनगाव जट्टू गावावर शोककळा पसरली आहे. तर लोणार तालुक्यासह जिल्हाभर हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांकडून मदतकार्य
घटनेची माहिती मिळताच लोणार पोलीस स्टेशनचे संजय जाधव, पोहेकॉ गणेश तांबसकर हे सर्व प्रथम घटनास्थळावर पोहचले. त्यांनी अपघातातील जखमींना तत्काळ लोणार येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तसेच नागरिकांनी मदत कार्य केले. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय इंगळे करीत आहेत.

