Demand to name government medical college after Dr. Babasaheb Ambedkar : बुलडाणा जिल्ह्याला राजमाता जिजाऊ नगर व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाव देण्याची मागणी

बुलडाणा (प्रतिनिधी) – बुलडाणा जिल्ह्याचे नामांतर करून त्याला “राजमाता जिजाऊ नगर” असे नाव देण्यात यावे तसेच बुलडाणा येथील नव्याने सुरू झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्यावतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात पक्षाच्या शिष्टमंडळाने बुलडाणा विधानसभेचे आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांना निवेदन सादर केले.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र शासनाने अलीकडेच काही जिल्ह्यांचे नामांतर करून ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच धर्तीवर बुलडाणा जिल्ह्यालाही ऐतिहासिक ओळख देण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान सिंदखेड राजा हे बुलडाणा जिल्ह्यात आहे. त्यामुळे या जिल्ह्याला “राजमाता जिजाऊ नगर” असे नाव दिल्यास त्यांच्या कार्याचा सन्मान होईल, असे मत व्यक्त करण्यात आले.
निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की, “जिच्या हाती पाळण्याची दोरी, तीच जगाला उदारी” या उक्तीप्रमाणे जिजाऊंचे कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्या नावाने जिल्ह्याचे नामकरण झाल्यास त्यांच्या विचारांची व कार्याची आठवण प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन जीवनात राहील. शासनाच्या नकाशांपासून शालेय अभ्यासक्रमांपर्यंत सर्वत्र “राजमाता जिजाऊ नगर” हे नाव रूजेल आणि नवीन पिढीला इतिहासाची जाणीव होईल.
बुलडाणा जिल्हा पर्यटनदृष्ट्याही महत्त्वाचा असून लोणार सरोवर, संग्रामपूर येथील बौद्धकालीन स्तूप तसेच शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर यांसारखी प्रसिद्ध स्थळे येथे आहेत. जर जिल्ह्याचे नामकरण “राजमाता जिजाऊ नगर” असे झाले, तर पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळेल आणि जिल्ह्याची ओळख राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक ठळक होईल, असे मत शिष्टमंडळाने व्यक्त केले.
यासोबतच बुलडाणा येथे सुरू झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणीही करण्यात आली. डॉ. आंबेडकर यांनी समाजातील वंचित घटकांसाठी दिलेल्या योगदानाचा गौरव म्हणून त्यांच्या नावाने हे महाविद्यालय ओळखले जावे, अशी भूमिका मांडण्यात आली.
या मागण्यांसंदर्भात आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांनी निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक स्वीकार करत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले. ही मागणी विधानसभेत मांडण्यासाठी प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.
या वेळी प्रा. इंजि. भैयासाहेब पाटील, पत्रकार बाबासाहेब जाधव, जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सरदार, इंजि. शरद खरात, नबाब मिर्झा बेग, वंदनाताई वाघ, प्रा. मुक्तार पठाण, आशाताई वानखडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच विविध तालुक्यांतील पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही या मागणीला पाठिंबा दर्शविला.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे जिल्हा संपर्क प्रमुख बाबासाहेब जाधव यांनी यावेळी आशा व्यक्त केली की, आमदार संजूभाऊ गायकवाड या मागणीला योग्य न्याय देतील आणि बुलडाणा जिल्ह्याच्या ऐतिहासिक ओळखीला नवे स्थान मिळवून देतील.


