District Collector Dr. Kiran Patil enthusiastically inaugurated the farmer awareness workshop : जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते शेतकरी प्रबोधन कार्यशाळेचे उत्साहात उद्घाटन.

बुलढाणा, दि. २०: (जिमाका) शेतकऱ्यांनी आता केवळ पारंपारिक पिकांवर अवलंबून न राहता शाश्वत शेती आणि जोडधंद्यांकडे वळले पाहिजे. बिजोत्पादन, फळबागा आणि भाजीपाला उत्पादनातून शेतकरी आपली आर्थिक प्रगती निश्चितच साधू शकतात, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.
चिखली येथील शिवाजी महाविद्यालयात आयोजित ‘शेतकरी प्रबोधन कार्यशाळेच्या’ उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉ. पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थव्यवस्था नियमन केंद्र आणि शिवाजी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात बोलताना हर्षवर्धन देशमुख यांनी जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या कार्याचा गौरव केला. “जिल्ह्याचा प्रमुख जर शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणारा असेल, तर तो जिल्हा सर्व स्तरावर प्रगती करतो. जिल्हाधिकाऱ्यांनी सावकारी पाशातून शेतकऱ्यांची मुक्तता करून त्यांना जमिनीचे पट्टे मिळवून दिले, हे कार्य समाजहिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे ते म्हणाले. याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांचा शाल व सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

डॉ. पंजाबराव देशमुख यांनी देशाचे पहिले कृषिमंत्री म्हणून मांडलेली धोरणे आजही शेतीसाठी तितकीच उपयुक्त असल्याचेही देशमुख यांनी नमूद केले. या कार्यशाळेच्या निमित्ताने शेती उत्पादित धान्य, फळे आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले होते, ज्याला शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. प्रमोद पडोळे यांनी, तर सूत्रसंचालन गणेश मालटे यांनी केले. याप्रसंगी जिल्हा कृषी अधीक्षक संतोष डाबरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अमोल झापे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

