District level agricultural festival; sales exhibition in Buldana, Mini Saras from March 5 to 9 : जिल्हास्तरीय कृषी महोत्सव;बुलडाण्यात विक्री प्रदर्शन, मिनी सरस ५ ते ९ मार्चदरम्यान

PMFME योजनेंतर्गत खरेदी-विक्री संमेलनाचे आयोजन
बुलढाणा : ग्रामविकास विभाग व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा विक्री प्रदर्शन, मिनी सरस व पौष्टिक तृणधान्य जिल्हास्तरीय कृषी महोत्सव तसेच PMFME योजनेंतर्गत खरेदी-विक्री संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव दि. ५ ते ९ मार्च २०२६ या कालावधीत जिजामाता प्रेक्षागार क्रीडा व व्यापारी संकुल येथे होणार आहे.
अन्न व पोषण सुरक्षा अभियानांतर्गत अन्नधान्य पिके व पौष्टिक तृणधान्यांचा प्रसार, मूल्यवर्धन आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कार्यक्रमाचे आयोजन कृषी विभाग, महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) आणि कृषी संलग्न विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. यामध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) अंतर्गत लाभार्थी व उत्पादक गटांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. कृषी महोत्सवात अन्नधान्य व पौष्टिक तृणधान्ये (नाचणी, ज्वारी, बाजरी आदी) यांचे प्रदर्शन व विक्री, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO) व स्वयं सहाय्यता गट (SHG) यांचे स्टॉल्स, तसेच सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांची उत्पादने प्रदर्शित करण्यात येणार आहेत. कृषी तज्ञांचे मार्गदर्शन व चर्चासत्रे, मूल्यवर्धन, ब्रँडिंग व पॅकेजिंग विषयक प्रात्यक्षिके आयोजित केली जाणार असून खरेदीदार व उत्पादक यांच्यात थेट संवाद साधण्यासाठी विशेष खरेदी-विक्री संमेलन होणार आहे.
या उपक्रमामुळे स्थानिक शेतकरी, महिला बचत गट आणि सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योजकांना थेट बाजारपेठ उपलब्ध होऊन त्यांच्या उत्पन्नवाढीस चालना मिळणार आहे. तसेच पौष्टिक तृणधान्यांचे महत्त्व आणि पोषणमूल्यांविषयी जनजागृती होण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यातील सर्व शेतकरी, उद्योजक, स्वयं सहाय्यता गट, कृषी विद्यार्थी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

