Dongaon Health Center receives Balasaheb Thackeray Arogya Ratna Award : डोणगाव आरोग्य केंद्राला बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार

मेहकर : तालुक्यातील डोणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला यावर्षीचा ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
उत्कृष्ट आरोग्य सेवा देणाऱ्या केंद्रांमधून प्रत्येक जिल्ह्यातून एका प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड केली जाते. यंदा बुलढाणा जिल्ह्यातून डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड झाल्याने परिसरात आनंद व्यक्त होत आहे.
डोणगाव हे राज्य महामार्गावरील महत्त्वाचे गाव असून या केंद्राशी सुमारे २७ खेडी संलग्न आहेत. एवढेच नव्हे तर परजिल्ह्यातील रुग्णही दररोज तपासणीसाठी येतात. विशेष म्हणजे, या केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रियांचे प्रमाण लक्षणीय असून सेवा कार्यात सातत्य व गुणव्त्त्तेला प्राधान्य दिले जाते. या उल्लेखनीय कामगिरीमुळे केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राम गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांची ‘महाआरोग्य सन्मान’ पुरस्कारासाठीही निवड झाली आहे. यासंदर्भातील अधिकृत पत्र आरोग्य सेवाच्या सहसंचालक डॉ. सरिता हजारे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांना पाठविले आहे.
या निवडीबद्दल डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राम गायकवाड व सर्व कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. ग्रामीण भागात उत्कृष्ट व प्रभावी आरोग्य सेवा देण्याच्या त्यांच्या कार्याची ही राज्यस्तरीय पावती मानली जात आहे.

