Dr. Ashutosh Gupta honored with Ayurveda Gaurav Award by the President : राष्ट्रपतींच्या हस्ते आयुर्वेद गौरव पुरस्काराने डॉ. आशुतोष गुप्ता यांचा सन्मान

बुलढाणा : चिखली येथील सुपुत्र डॉ. आशुतोष गुप्ता यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आयुर्वेद गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
आयुष मंत्रालय भारत सरकार व अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याच्या उद्घाटन समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री मकरंद पाटील आणि कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच माजी मंत्री डॉ. संजय कुटे आणि आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते.
डॉ. आशुतोष गुप्ता यांनी आयुर्वेद क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतल्या गेल्याने चिखली शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

