First farmer suicide : यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील साहेबराव करपे यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या सामूहिक आत्महत्येच्या स्मरणार्थ चिखली शहरात १९ मार्चला ‘एक दिवस अन्नदात्यासाठी’ हा स्मृतिदिन पाळण्यात आला.

सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांच्या अन्नदात्यासाठी जगविल्या संवेदना
चिखली : यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील साहेबराव करपे यांच्या कुटुंबीयांनी सामूहिक आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येची शासन दरबारी पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद झाली. त्यांच्या स्मृतिनिमित्त चिखली शहरात १९ मार्चला ‘एक दिवस अन्नदात्यासाठी’ हा स्मरणदिन पाळण्यात आला.
सामाजिक व राजकीय पक्षांच्या संवेदनशील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एक दिवस उपवास करीत करपे कुटुंबीयांना आदरांजली वाहिली.
यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाणचे रहिवासी साहेबराव करपे पाटील यांच्यासह पत्नी मालतीताई आणि चार चिमुकल्या मुलांसह १९ मार्च १९८६ रोजी पवणार येथील आश्रमात शासनाच्या उदासीन धोरणांमुळे आत्महत्या केल्याची वेदनादायी आणि समाजमन सुन्न करणारी घटना घडली होती. या आत्महत्येला चाळीस वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानंतरही राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे. याबद्दल यावेळी खंत व्यक्त करण्यात आली.
बळीराजाच्या आत्महत्यांना थांबाव्यात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी यावी, या उद्देशाने दिवंगत डॉ. सत्येंद्र भुसारी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह गेल्या १५ वर्षांपासून ‘एक दिवस अन्नदात्यासाठी’ हा उपक्रम सातत्याने राबविला. काही महिन्यांपूर्वी सत्येंद्र भुसारी यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चातही एक दिवस उपवास करून श्रद्धांजली वाहिली जात आहे. या उपक्रमातून शेतकरी प्रश्नांवर प्रकाश टाकत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आजच्या स्मृति आंदोलनाची सुरुवात स्व. साहेबराव करपे करपे पाटील व त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.
शेतीमालाला हमीभाव देणे, शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे, सिंचन व वीज यांसारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रभावी धोरणे राबविणे अशा मागण्या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी मांडल्या.
या आंदोलनामुळे शेतकरी प्रश्नांबाबत समाजात व्यापक जागृती निर्माण झाली असून, अन्नदात्यांच्या न्याय हक्कांसाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.


