mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

For a developed India : विकसित भारतासाठी आत्मनिर्भर बुलढाण्याचा संकल्प

शेअर करा :

For a developed India : विकसित भारत २०४७ च्या विकासगाथेत बुलढाणा जिल्ह्याचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले जावे आणि प्रशासन, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी आत्मनिर्भर बुलढाणा घडवण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प करा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी प्रजासत्ताकदिनी केले.

For a developed India
Resolve to build self-reliance for a developed India

जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी प्रजासत्ताकदिनी केले संबोधन
७७ वा प्रजासत्ताकदिन उत्साहात

शरद माळोदे
बुलढाणा : विकसित भारत २०४७ च्या विकासगाथेत बुलढाणा जिल्ह्याचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले जावे आणि प्रशासन, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी आत्मनिर्भर बुलढाणा घडवण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प करा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी प्रजासत्ताकदिनी केले.

देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस कवायत मैदानात जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार संजय गायकवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांच्यासह प्रशासनातील अधिकारी, विभाग प्रमुख, स्वातंत्र्य सेनानी, वीरमाता, वीरपत्नी, ज्येष्ठ नागरिक, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी पालक, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील पुढे म्हणाले की, भारत हा परिवर्तन, प्रगती आणि आत्मविश्वासाच्या नव्या पर्वात प्रवेश करत आहे. आज प्रत्येक भारतीयाने ‘विकसित भारतचा संकल्प करण्याचा क्षण आहे. आज भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश तर आहेच, पण त्याचबरोबर जगातील प्रमुख अर्थव्यवस्थेपैकी एक राष्ट्र बनला आहे. हे यश कोट्यवधी भारतीयांच्या प्रामाणिक श्रमांचे फळ आहे. महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचे ग्रोथ इंजिन मानले जाते आणि या विकासयात्रेत बुलढाणा जिल्हाही आत्मविश्वासाने पुढे जात आहे. शेती, उद्योग, शिक्षण, सहकार, डिजिटल सेवा, महिला सक्षमीकरण आणि युवक विकास या सर्व क्षेत्रांत जिल्हा उल्लेखनीय प्रगती करीत असल्याचे ते म्हणाले.

पारंपरिक शेतीसोबत फळबाग लागवड काळाची गरज

जिल्हाधिकारी डॉ. पाटील पुढे म्हणाले, यावर्षी जिल्ह्यात खरीप हंगामात ७ लाख २९ हजार हेक्टर व रब्बी हंगामात ३ लाख ७९ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. खरीप हंगामात विविध पिकांचे उल्लेखनीय उत्पादन झाले असून रब्बीमध्ये हरभरा, गहू व मक्याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. पारंपरिक शेतीसोबत फळबाग लागवड काळाची गरज आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजना व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत २२ हजार हेक्टरवर फळबाग लागवड झाली असून चालू वर्षी आणखी अडीच हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे.

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ४२९ कोटी

अतिवृष्टी, पूर, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासन खंबीरपणे उभे आहे. सन २०२५-२६ मध्ये ६ लाख १६ हजार हेक्टर क्षेत्राच्या नुकसानीसाठी ५६२ कोटींचा निधी मंजूर करून ६ लाख ४० हजार शेतकऱ्यांना ४२९ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीसाठी पीककर्जाला प्राधान्य देत ७०२ कोटी रुपयांचे पीककर्ज वितरित करण्यात आले आहे. ॲग्रीस्टॅक अंतर्गत ४ लाख ८४ हजार शेतकरी ओळख क्रमांक तयार झाले असून उर्वरित शेतकऱ्यांनी नोंदणी करावी. तसेच रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी उपक्रमात आतापर्यंत ८० हजार हेक्टरवरील प्लॉटवर नोंदी पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जिगाव सिंचन प्रकल्पाला चालना

जिगाव सिंचन प्रकल्पासाठी २२०० हेक्टर जमिनीचे भूसंपादन पूर्ण होऊन १६०० कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. ४५०० हेक्टर जमिनीचे भूसंपादन अंतिम टप्प्यावर आहे. तसेच बाधित गावांचे पुनर्वसनही वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

लोणार सरोवराचे आयआयटी मुंबईमार्फत संशोधन

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत ९६ हजारांहून अधिक लाभार्थ्यांना दाखले देण्यात आले, १४४७  पाणंद रस्ते खुले झाले व २४२०  गावांना स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध झाली आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून शाळा, अंगणवाड्या, आरोग्य केंद्रे, रुग्णालये व नगरोत्थानासाठी एकूण १२४.५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यासह आदिवासी बांधवांसाठी वनहक्क कायद्यान्वये ५१७ वनपट्ट्यांचे वाटप करण्यात आले आहे. लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी आयआयटी मुंबईच्या सहकार्याने संशोधन केले जात आहे. तसेच पर्यटन वाढीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

निर्यातीत बुलढाणा जिल्हा अव्वल

प्रधानमंत्री व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत ८२९  उद्योगांना मंजुरी मिळून ६१२ उद्योग सुरू झाले आहेत. गेल्या वर्षी जिल्ह्यातून ८७४ कोटी रुपयांची निर्यात झाली असून अमरावती विभागात जिल्हा प्रथम व राज्यात चौथा क्रमांकावर आला आहे. चालू वर्षात १५०० कोटींचे उद्दिष्ट असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

नोकरी शोधणारे नाही, तर नोकरी देणारे बना

युवकांना संबोधित करताना जिल्हाधिकारी म्हणाले की, आजचा काळ हा तुमच्यासाठी सुवर्णसंधी घेऊन आला आहे. स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया, अॅग्री-स्टार्टअप्स, ई-कॉमर्स आणि सेवा क्षेत्रात अपार संधी उपलब्ध आहेत. यातून आजचा युवक नोकरी शोधणारा नाही, तर नोकरी देणारा बनू शकतो. त्यामुळे या संधीचं सोनं करा, कारण तुमच्या कामातून, कौशल्यातून आणि प्रामाणिक प्रयत्नातूनच जिल्ह्याचा आणि देशाचा विकास शक्य आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


डिजिटल क्रांतीच्या दिशेने पाऊल

प्रशासनामार्फत ‘महसूल मित्र- सुलभ व्हॉट्सॲप चॅटबॉट सेवा’ सुरू करण्यात आली असून सेवा हक्क, सहज प्रणाली, प्रतिसाद प्रणाली अशा विविध सेवा नागरिकांना सुलभपणे उपलब्ध केल्या आहेत. यासह भूसंपादन व पुनर्वसन प्रक्रियेच्या सर्व टप्प्यांच्या व्यवस्थापनासाठी प्रशासनाने ‘पुनर्भू- भूसंपादन प्रणाली’विकसित केली असून याद्वारे संपूर्ण माहिती ऑनलाईन उपलब्ध केली आहे. या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले.

For a developed India

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top