Grand celebration of Chhatrapati Shivaji Maharaj’s birth anniversary 2026 in chandol city : चांडोळ नगरीत छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव २०२६ चा भव्य सोहळा.
धाड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने बुलढाणा जिल्ह्यातील चांडोळ नगरीत प्रथमच पोवाडे, वीररस कथन आणि स्फूर्ती गीतांचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा ऐतिहासिक कार्यक्रम शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच बुधवार, १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता होळी मैदानावर होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, शिव-शंभू आणि महाराणा प्रताप यांच्या विचारांचा जागर करून तरुण पिढीला योग्य दिशा देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम राबवला जात आहे. युवा शाहीर विक्रांतसिंह राजपूत झी युवा फेम महाविजेता यांच्या नेतृत्वाखाली १५ जणांचा संच महाराष्ट्राच्या पारंपरिक शाहीरी बाण्यात पोवाडे, वीररस आणि स्फूर्तीदायी गीत सादर करणार आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक म्हणजे शिवसेना उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील गुजर , सामाजिक कार्यकर्ते दीपक धनावत, शिवसेना उपतालुकाप्रमुख मयूर पडोळ आणि चांडोळचे समस्त ग्रामस्थ आहेत.
यानंतर गुरुवार, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती सायंकाळी ७ वाजता पथनाट्य, वेशभूषा प्रदर्शन, लाठीकाठी, आणि आतिषबाजीचा कार्यक्रमही होणार आहे.
समस्त हिंदुस्थानात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. चांडोळ आणि परिसरातील शिवभक्त, महाराणा प्रताप भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, अशी आयोजकांकडून विनंती करण्यात आली आहे.
हा कार्यक्रम चांडोळ नगरीत प्रथमच होत असल्याने स्थानिक स्तरावर मोठा उत्साह आहे. शिवराय आणि महाराणा प्रताप यांच्या विचारांचा प्रसार आणि तरुणाईमध्ये स्वाभिमान जागृत करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

